कुलरमध्ये गुंगीचे औषध
By admin | Published: June 7, 2014 01:54 AM2014-06-07T01:54:49+5:302014-06-07T01:54:49+5:30
कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून संपूर्ण घर लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.
श्रीकृष्णनगरात तीन घरफोड्या : घराबाहेरील कुलर धोकादायक
यवतमाळ : कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून संपूर्ण घर लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी रात्री दर्डानगर परिसरातील श्रीकृष्ण नगरात अशा पद्धतीने तीन घरे फोडण्यात आली. चोरट्यांनी हा नवा फंडा शोधून काढला असून अशी टोळीच शहरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.
श्रीकृष्णनगर येथील डॉ. प्रतीक सुनील खोडवे यांनी आपल्याकडील चोरीची वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अन्य दोन घरी झालेल्या चोर्यांची मात्र अद्याप तक्रार नोंदविली गेलेली नाही. घटनेच्या वेळी खोडवे यांच्याकडे आई आणि भाऊ हे दोनच सदस्य घरात होते. एरवी रोज रात्री ३ वाजता पाणी पिण्यासाठी उठणार्या डॉ. सुषमा खोडवे आणि त्यांचा मुलगा त्या रात्री गाढ झोपी गेले होते. घरात चोरट्यांनी मागील दाराने प्रवेश केला. सुषमा खोडवे यांच्या उषाखाली ठेवलेली चाबी काढून चोरट्यांनी कपाट उघडले. त्यातील रोकड, सुमारे ३0 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. घरातील महागड्या साड्या व अन्य साहित्याची फेकाफेक केली. खोडवे यांच्या मुलाची पल्सर गाडीही चोरट्यांनी नेली. परंतु चिंतामणी ट्रॅव्हल्स नजीक ती सोडून देण्यात आली. घराच्या आवारात उभी असलेली कारही नेण्याचा त्यांचा मनसुभा असावा. कारण कारची चावी कंपाऊंडच्या भिंतीवर आठळून आली. पहाटे ५ वाजता झोप उघडल्यानंतरच चोरीचा हा प्रकार पुढे आला.
कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून ही चोरी केली असावी, असा संशय सुषमा खोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरातील साफसफाईसाठी दोन मुलांना बोलविले होते. ही मुले पूर्ण वेळ घरात वावरली. त्यातील एकाने मागील दार तुटलेले असल्याची जाणीवही खोडवे यांना करून दिली आणि नंतर याच तुटलेल्या दारातून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. श्रीकृष्णनगरातीलच अन्य दोन घरांनाही चोरट्यांनी याच पद्धतीने निशाणा बनविले. तेथेही घटनेच्यावेळी घरात अनेक सदस्य झोपलेले होते. त्यांच्याकडील दोनही कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकल्याचा संशय आहे. यापूर्वी हाच फंडा वापरुन बोरीअरबमध्ये एकाच रात्री पाच ते सहा घरे फोडण्यात आली होती. चोरट्यांचा हा फंडा घराबाहेरील कुलरसाठी धोकादायक ठरू लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ शहरात गेल्या दोन महिन्यांत चोरी व घरफोडीच्या सव्वाशेवर घटनांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी दागिने व रोकड असा लाखोंचा ऐवज लुटून नेला. अनेक चोर्यांची तर तक्रारही नोंदविण्यास पोलीस टाळाटाळ करतात. सीतारामनगरी भागातील नागरिकांना याचा अनुभव गेल्या आठवड्यात आला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चोर्या होत असूनही पोलिसांचे डिटेक्शन मात्र शून्य आहे. डीबी स्कॉड, क्राईम ब्रँच आणि एसपींची विशेष पथके चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.