महागावातील ११ ग्रामसेवकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:42 AM2021-03-05T04:42:14+5:302021-03-05T04:42:14+5:30
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमध्ये वाॅटर एटीएम बसविण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून वॉटर एटीएम खरेदी करण्यात ...
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींमध्ये वाॅटर एटीएम बसविण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून वॉटर एटीएम खरेदी करण्यात आले. मात्र, खरेदी करताना ग्रामसेवक व सरपंचांनी नियम पायदळी तुडविले. कुठलीही ई-निविदा न काढता परस्पर एका कंपनीला कंत्राट देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी यापूर्वी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. विधानसभेत प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
ई-निविदा न करता दोन ते अडीच लाख रुपयांचे वाॅटर एटीएम चक्क आठ ते दहा लाख रुपयांपर्यंत खरेदी करण्यात आले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकार घडला आहे. दोन ते तीन लाखांच्या वर असलेल्या कामाला ई-निविदा करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये ई-निविदेला बगल देण्यात आली. चक्क आठ ते दहा लाख रुपये खर्च वाॅटर एटीएमवर करण्यात आला. लाखो रुपयांचा खर्च करूनदेखील नागरिकांना उपयोग होत नव्हता. अनेक वाॅटर एटीएम बंद असल्याचे आढळून आले. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कासारबेहळ, धनोडा, दहीसावळी, धारमोहा, बोरी ई, वनोली, मुडाणा, बेलदरी, पिंपळगाव, पोखरी आदी ११ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस पंचायत समितीला धडकताच एकच खळबळ उडाली आहे.
कोट
वॉटर एटीएमबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाहणी केली असता बहुतांश वाॅटर एटीएम बंद आढळले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकांना शोकॉज नोटीस देण्यात आली.
- मयूर अंदेलवाड,
गटविकास अधिकारी, महागाव