‘पीडब्ल्यूडी’ची ईगल कंस्ट्रक्शनला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:11+5:30

कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या नाही.

Notice to Eagle Construction of PWD | ‘पीडब्ल्यूडी’ची ईगल कंस्ट्रक्शनला नोटीस

‘पीडब्ल्यूडी’ची ईगल कंस्ट्रक्शनला नोटीस

Next
ठळक मुद्दे१८६३ कोटींच्या रस्त्यांचे कंत्राट : संथ गती, पाच टक्केही काम नाही, केवळ रस्ते खोदले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हायब्रीड अ‍ॅन्यूईटी अंतर्गत १८६३ कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कल्याण येथील ईगल कंस्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम खात्याने कामाच्या संथ गतीबाबत नोटीस बजावली आहे. बांधकाम सचिवांच्या आदेशावरून मुख्य अभियंत्यांनी या कामांची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणीही केली.
हायब्रीड अ‍ॅन्यूईटी अंतर्गत पाच प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. उल्हासनगरच्या ईगल इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीला या कामांचा एक हजार ८६३ कोटींचा कंत्राट मिळाला आहे. यामध्ये हिंगोली-यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेंबाळपिंपरी-पुसद-गुंज-माहूर, दिग्रस-पुसद-दारव्हा-नेर, यवतमाळ-कोळंबी-घाटंजी, यवतमाळ-दारव्हा-कुपटा आणि कुपटा-मंगरूळपीर या पाच रस्त्यांचा समावेश आहे.या कामाच्या संथ गतीबाबत मुंबईत बांधकाम सचिवांपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. मुळात ईगल कंस्ट्रक्शनने वर्क आॅर्डर आठ महिने विलंबाने घेतली आहे. २६ मार्च २०१९ पासून सुरू झालेले हे काम किमान २० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते पाच टक्केही झाले नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे काम झालेले नसताना मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्स म्हणून कंत्राटदाराने १८५ कोटी रुपयांची उचलही केली आहे.
कंत्राटदाराने बहुतांश रोड दोन्ही बाजूंनी खोदून ठेवल्याने वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी व सायंकाळी जनावरे या रोडवरून जातात. ते खड्ड्यात उतरत नाही. अशावेळी दोन वाहने पास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ खड्डे खोदले गेले, सुरक्षेच्या उपाययोजना केल्या गेल्या नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना या रस्ते विकासाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. क्रेशर, रेडिमिक्स, काँक्रिट युनीट नसणे, मटेरिअल साईड नसणे, रॉ मटेरिअलची पर्यायी व्यवस्था नसणे, खोदकाम झाल्यानंतर भराव न टाकणे, कुठेही युनीट उभे नसणे आदी ओरड या कंत्राटदाराबाबत बांधकाम खात्यातून ऐकायला मिळते. रस्त्यांची पूर्णत: चाळणी झाली आहे. त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. त्यापोटी ३० कोटी रुपये दिले गेले आहे. मात्र त्यानंतरही रस्त्यावरील खड्डे कायम आहे. पर्यायाने या मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. या कामावरील सुपरव्हीजनसाठी स्वतंत्र अभियंता दिसत नाही. कंत्राटदार बिग बजेट असल्याने बांधकाम खातेही त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. केवळ नोटीस बजावण्याची खानापूर्ती केली जात आहे. सदर कंत्राटदाराने २० टक्के काम केलेच नाही तर त्याला १८५ कोटी रुपये दिले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्य अभियंत्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी
कामाच्या या संथ गतीबाबत अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदाराला नोटीस बजावल्या आहे. यापूर्वी या कामाची अधीक्षक अभियंत्यांनी पाहणी केली होती. गती वाढविण्याबाबत कंत्राटदाराला सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही कामकाज न सुधारल्याने दोन दिवसांपूर्वी सचिवांच्या आदेशावरून अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांनी या कामांवर भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकाम खात्याने आतापर्यंत कंत्राटदाराला तीन-चार नोटीस बजावल्याचे सांगितले जाते.

Web Title: Notice to Eagle Construction of PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.