जमीन हस्तांतरणप्रकरणी दारव्हा एसडीओंना नोटीस
By admin | Published: November 8, 2014 01:45 AM2014-11-08T01:45:20+5:302014-11-08T01:45:20+5:30
माहूर येथील दत्त शिखर संस्थानच्या जमीन हस्तांतरण प्रकरणी अहवाल सादर करण्यात दारव्हा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली.
दारव्हा : माहूर येथील दत्त शिखर संस्थानच्या जमीन हस्तांतरण प्रकरणी अहवाल सादर करण्यात दारव्हा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. त्यामुळे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
दारव्हा तालुक्यातील महंमदपूर येथे २९४ एकर २६ गुंठे जमीन दत्तात्रय संस्थान शिखर माहूर यांच्या मालकीची आहे. ही जमीन भारत सरकारने इनाम स्वरूपात संस्थानला दिली होती. याबाबतचे पेरेपत्रक, हक्कनोंदणी दारव्हा तहसीलदाराच्या अभिलेखात १९३२-३३ पासून आहेत. परंतु या अभिलेखाची कोणतीही तपासणी न करता दिशाभूल करणारा अहवाल तहसीलदारांनी सादर केला. त्यावर आर्णी येथील गोपाल भारती यांनी आक्षेप दाखल केला. या आक्षेपावरून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.
त्यावरून उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या अध्यक्षतेखाली १० मार्च २०१४ रोजी समिती गठीत केली. परंतु १८ महिन्यांचा दीर्घ कालावधी आणि चौकशी समिती गठीत करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे भारती यांनी पुन्हा अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांना सूचीत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांना या प्रकरणात जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर केलेल्या कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते. परंतु उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहे. तसे न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)