कुख्यात ‘गब्ब्या’ वणी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: March 22, 2017 12:13 AM2017-03-22T00:13:20+5:302017-03-22T00:13:20+5:30
घरफोडीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या अखेर वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
वणी : घरफोडीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या अखेर वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने सात गुन्ह्यांची कबुली पोलिसांपुढे दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वणी शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे गुन्हे घडत होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी पोलीस दप्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी खबरे नेमले. तसेच घरफोडीच्या चौकशीसाठी एका पथकाचे गठण केले. दरम्यान, घरफोडी करण्यात सराईत असलेला कुख्यात मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या हा ब्राह्मणी फाटा परिसरात फिरत असल्याची टिप ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार कुळकर्णी यांच्या नेतृत्वात डी.बी.पथकाने ब्राह्मणी फाटा परिसराकडे धाव घेतली. पोलिसांचा ताफा दिसताच, गब्ब्याने पळ काढला. मात्र डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता त्याने वणी शहरात केलेल्या सात घरफोड्यांची कबुली दिली. पोलिसांनी दोन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक दुर्गालाल टेंभरे, जमादार वानोळे, अरुण नाकतोडे, डी.बी.पथकाचे कर्मचारी नायक पोलीस नफीस शेख, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, रुपेश पाली, दिलीप जाधव, नितीन सलाम, महेश नाईक, अमित पोयाम, चालक प्रशांत आडे यांनी केली.
गब्ब्याने घरफोडी करण्यात वाक्बगार असून त्याने यापूर्वी अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहे. पोलिसांवर हल्ला करणे, न्यायाधिशांवर चप्पल भिरकावणे अशा पद्धतीच्या गंभीर गुन्ह्यात त्याला अटकही झाली आहे. त्याच्या अटकेने गुन्ह्यांना आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)