कुख्यात सागवान तस्कर ‘अप्प्या’ अखेर गजाआड

By Admin | Published: March 20, 2016 02:26 AM2016-03-20T02:26:31+5:302016-03-20T02:26:31+5:30

कोट्यवधी रुपयांच्या सागवान तस्करीमध्ये १० वर्षांपासून फरार असलेला कुख्यात तस्कर अप्प्याला पकडण्यात पुसद वन विभागाने अखेर यश मिळविले आहे.

The notorious Sagwan smuggler 'Appa' finally goes away | कुख्यात सागवान तस्कर ‘अप्प्या’ अखेर गजाआड

कुख्यात सागवान तस्कर ‘अप्प्या’ अखेर गजाआड

googlenewsNext

१० वर्षे हुलकावणी : कोट्यवधींच्या अवैध वृक्षतोडीत सहभाग
पुसद : कोट्यवधी रुपयांच्या सागवान तस्करीमध्ये १० वर्षांपासून फरार असलेला कुख्यात तस्कर अप्प्याला पकडण्यात पुसद वन विभागाने अखेर यश मिळविले आहे.
शेख इरफान ऊर्फ अप्प्या शेख रहेमान (५०) रा. अमृतनगर खंडाळा ता. पुसद जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या १५ वर्षांपासून अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीत सक्रिय आहे. त्याच्यावर विदर्भ-मराठवाड्यात तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. विदर्भ-मराठवाडा व तेलंगणातील निजामाबादपर्यंत त्याचे सागवान तस्करीचे नेटवर्क आहे. एकट्या पुसद वन परिक्षेत्रांतर्गत त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहे. खंडाळा जंगलातून त्याने मोठ्या प्रमाणात सागवान तोड केली होती. गेल्या १० वर्षांपासून तो वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना चकमा देत फरार होता. अनेकदा त्याने वन कर्मचाऱ्यांवर हल्लाही चढविला. परंतु शनिवारी तो वन विभागाच्या हाती लागला.
येथील छत्रपती शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये दुपारी २ वाजता त्याला अटक करण्यात आल्याचा दावा पुसदचे वन परिक्षेत्र अधिकारी संजीव खंडारे यांनी केला आहे. त्याचे साथीदार मात्र फरार झाल्याचे वन अधिकारी सांगत आहे. या कारवाईत वनपाल जयंतीलाल राठोड, मनोहर पुंड, वनरक्षक दिलीप ठाकरे, पी.के. जाधव, पी.पी. गंगाखेडे आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

तपासही आंतरराज्यीय दर्जाचा होण्याची अपेक्षा
अप्प्या हा आंतरराज्यीय सागवान तस्कर असल्याचे वन अधिकारी सांगत आहे. त्यामुळे त्याने विदर्भासह मराठवाडा व शेजारील तेलंगणा राज्यात केलेल्या सागवान तस्करी, विक्रीच्या गुन्ह्यांचा तपासही आंतरराज्यीय पद्धतीनेच होणे अपेक्षित आहे. अप्प्या १० वर्ष फरार राहण्यामागे वन खात्याचे अपयश लपले आहे. खंडाळासारख्या गावातील तस्कर पुसद विभागातील कोणत्याही वन अधिकारी-कर्मचाऱ्याच्या हाती लागू नये यातच या अधिकाऱ्यांची निष्क्रियता सिद्ध होते. अप्प्याला फरार राहण्यात, त्याच्या खंडाळातील हालचालींकडे दुर्लक्ष करण्यामागे त्याची हल्ल्याची दहशत आणि त्याच्याशी काहींचे असलेले सलोख्याचे संबंधही कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
पुसदचे वन अधिकारी अप्प्यावर १३ आॅगस्ट २०१४ ला पहिला वन गुन्हा दाखल झाल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे तो १० वर्षांपासून सागवान तस्करीत फरार असल्याचे नमूद करीत आहे. त्यामुळे १३ आॅगस्टपूर्वी अप्प्यावर कुठे गुन्हा दाखल आहे हे शोधण्याचे आव्हान आहे.

Web Title: The notorious Sagwan smuggler 'Appa' finally goes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.