२४ नोव्हेंबर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन
By admin | Published: November 18, 2015 02:30 AM2015-11-18T02:30:20+5:302015-11-18T02:30:20+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त ....
कौशिकी चक्रवर्ती यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर करण्यात आले आहे.
जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे संगीत, कला, निसर्ग आदींवर निस्सीम प्रेम होते. आयुष्यभर त्यांनी आपले संगीत प्रेम जोपासले. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनाला संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक अजय चक्रवर्ती आणि अंजना चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी आपल्या असामान्य गायन शैलीने यवतमाळकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. कौशिकी यांनी वयाच्या ७ व्या वर्षीपासून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जोगमायादेवी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तत्त्वज्ञान या विषयात प्रथम श्रेणी डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपल्या गायकीचा स्वतंत्र ठसा उमटविला. अनेक मोठ्या संगीत समारोहातून कौशिकी यांनी आपल्या गायकीने रसिकांंना मंत्रमुग्ध केले. मुख्यत्वे करून भारतातील आयटीसी संगीत संमेलन, कॅलिफोर्नियाचा स्प्रिंग फेस्टिव्हल आॅफ म्युझिक, लॉसएंजिल्सचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव या सारखे भव्यदिव्य कार्यक्रमांचा समावेश आहे.
कौशिकी चक्रवर्ती यांंना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. त्यात १९९५ सालचा जाडू भट्ट, २००० साली आऊट स्टॅन्डींग यंगपर्सन, २००५ साली बीबीसी अवार्ड संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक बांगला व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायनही केले आहे. अशा या शास्त्रीय गायिका आपल्या असामान्य गायन शैलीची जादू यवतमाळकरांवर टाकणार आहे. या शास्त्रीय मैफलीत त्यांना तबल्यावर संदीप घोष साथ देणार असून हार्मोनियमवर अजय जोगळेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाला यवतमाळकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.