आता ११०० रुपयांचे सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:00 AM2022-07-08T05:00:00+5:302022-07-08T05:00:07+5:30
गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार ८६ रुपयांचा झाला आहे. परंतु, घरपोच डिलिव्हरी देताना ग्राहकांकडून थेट ११०० रुपये घेतले जात आहे. गावपातळीवर तर हा सिलिंडर १३०० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. यातूनच अनेकांनी संताप नोंदविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तूर्त गॅस बुकिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार ८६ रुपयांचा झाला आहे. परंतु, घरपोच डिलिव्हरी देताना ग्राहकांकडून थेट ११०० रुपये घेतले जात आहे. गावपातळीवर तर हा सिलिंडर १३०० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागत आहे. यातूनच अनेकांनी संताप नोंदविला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी तूर्त गॅस बुकिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सहा लाखांवर घरगुती गॅस सिलिंडरधारक आहे. यातील उज्ज्वला गॅस धारकांना सबसिडी मिळणार आहे. परंतु, प्रारंभी पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. मात्र, इतर सर्वसामान्य नागरिकांना पूर्ण रक्कम भरून केवळ १९ रुपये सबसिडी मिळणार आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडलेले आहेत. राज्यात नव्याने सरकार आल्यानंतर महागाईवर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सिलिंडरच्या किमत ५० रुपयांनी वाढल्या आहेत. पूर्वी एक हजार ३६ रुपये दराने मिळणारे सिलिंडर आता वाढीव दरामुळे एक हजार ८६ रुपये ५० पैसे इतक्या दराचे झाले आहे. हे वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा फटका गॅस एजन्सीधारकांनाही बसला आहे. गत दोन महिन्यांपासून या ठिकाणी बुकिंगचे प्रमाण घटल्याचे सांगितले जात आहे.
केरोसीन मिळेल काय; जनसामान्यांचा सवाल
- यवतमाळ जिल्हा हा केरोसीनमुक्त जिल्हा झाला आहे. सिलिंडरच्या वाढलेल्या संख्येमुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला. आता दर वाढल्याने पुन्हा केरोसीनवर स्वयंपाक करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. परंतु केरोसीन मिळेल का हा प्रश्न आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दर २१२६ रुपये
- घरगुती गॅसच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडर दुप्पट आहे. २१२६ रुपये दराने हे सिलिंडर व्यावसायिकांना मिळत आहे. घरगुती गॅससोबत या सिलिंडरच्या किमती वाढल्या नाही. परंतु पूर्वीच याचे दर दुप्पट असल्याने व्यावसायिकांनाही हे सिलिंडर खरेदी करणे महाग पडत आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे.