आता प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:28 PM2019-06-24T12:28:23+5:302019-06-24T12:28:47+5:30
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. आता केंद्र शासनाने त्याही पुढचे पाऊल टाकत महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र शासनाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. आता केंद्र शासनाने त्याही पुढचे पाऊल टाकत महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदांची माहिती पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राध्यापक भरतीतील गैरप्रकाराला आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पायबंद बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने त्यासाठी ‘एनएचईआरसी डॉट इन’ हे पोर्टल विकसित केले आहे. आता सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना रिक्त पदांची भरती करण्यासाठी या पोर्टलवर जावे लागणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या महाविद्यालयाची प्राध्यापकसंख्याही विद्यार्थीसंख्येशी जोडली जाणार आहे. ज्या महाविद्यालयांना या शैक्षणिक सत्रात प्राध्यापक नियुक्त करायचे आहे, त्यांना आपल्या महाविद्यालयातील १ ऑक्टोबर २०१७ रोजी असलेली विद्यार्थी संख्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर भरावी लागणार आहे. त्या आधारेच सध्या सर्व महाविद्यालयांमध्ये पदभरतीची मोहीम राबविली जाणार आहे.
प्राध्यापक भरती संदर्भातील हा महत्वाचा बदल शैक्षणिक संस्थांमधील ‘देवाण-घेवाणी’साठी धक्कादायक ठरणार आहे. त्यासाठी संस्था चालकांची तयारी व्हावी या दृष्टीने राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने १९ जून रोजी सर्व सहसंचालक आणि महाविद्यालयांना सविस्तर पत्र पाठवून ऑनलाईन पोर्टलची माहिती दिली आहे. तर सोमवारी २४ जून रोजी नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयांसाठी विशेष कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी येथे दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या कार्यशाळेला उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांनी सर्व प्राचार्यांना पाचरण केले आहे.
उच्च शिक्षण सचिव घेणार आढावा
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील प्राध्यापक भरतीसंदर्भात ऑनलाईन प्रक्रिया अवलंबिली आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांना पोर्टलवर माहिती भरण्याचे निर्देश आहे. मात्र ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबविली जात असल्याने अनेक संस्था चालक यात उदासीनता दाखविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी २५ जून रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे उच्च शिक्षण सचिव महाराष्ट्रातील पदभरतीचा व्हीसीद्वारे आढावा घेणार आहे.
केंद्रासोबत राज्य शासनाचाही दणका
प्राध्यापकांच्या नेमणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून मर्जीतील प्राध्यापक नेमण्यावर संस्थाचालकांचा जोर आहे, असा मुद्दा शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यावर प्राध्यापकांच्या मुलाखतीचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येईल, असे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. शिवाय प्राध्यापक भरतीसाठी सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सिस्टीम आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचदरम्यान केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही पदभरतीसाठी पोर्टलची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या मनमानीला केंद्र आणि राज्य शासनाने एकाच वेळी दणका दिल्याचे दिसते.