आता एसटीचे वाहक-चालक ठरविणार बस कुठे जाणार, कुठे थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 08:10 AM2021-09-29T08:10:00+5:302021-09-29T08:10:01+5:30
Yawatmal News ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतील आणि ज्या थांब्यांवर एसटीला अधिक उत्पन्न मिळेल, अशा ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना येण्यापूर्वीच वाहक आणि चालकांना एसटी बसेस थांबविण्याचा अधिकार दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी वाहनांच्या स्पर्धेत एसटीचा उत्पन्नाचा आलेख घसरू नये म्हणून एसटी महामंडळाने लवचीकता आणली आहे. यात ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतील आणि ज्या थांब्यांवर एसटीला अधिक उत्पन्न मिळेल, अशा ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना येण्यापूर्वीच वाहक आणि चालकांना एसटी बसेस थांबविण्याचा अधिकार दिला आहे. (Now the carrier-driver of ST will decide where the bus will go and where it will stop.)
यामुळे पूर्वी एसटी न थांबल्याने प्रवाशांची होणारी ओरड कमी होईल. याशिवाय एसटीचे उत्पन्न वाढविण्यात मोलाचा हातभार लागेल. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मधातील प्रवासीही एसटीमध्ये घेता येतील. यातून उत्पन्नात मोठी भर पडेल.
मार्ग आणि थांबे ठरविण्यात वाहक आणि चालक त्यांचा पूर्वीचा अभ्यास गृहीत धरून निर्णय घेतील. यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय सर्वाधिक प्रवासी एसटी महामंडळाला मिळतील. यातून उत्पन्न वाढेल.
सूचनांचे होणार रजिस्टर
एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कुठल्या मार्गावर अधिक प्रवासी मिळू शकतात याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत. या सूचनेनुसार ठिकाणे आणि एसटीच्या वेळा ठरविण्यासाठी एक रजिस्टर मेंटेन केले जाणार आहे. त्यावर लिहिलेल्या सूचना आणि त्याचा पाठपुरावा याची माहिती घेतली जाणार आहे. यामुळे वाहक आणि चालकांनी केलेल्या सूचनेनुसार एसटीच्या उत्पन्नात काय फरक पडला याची माहिती समजण्यास मदत होणार आहे.
मार्ग, थांबेही ठरविणार
एक्स्प्रेस वाहनांना थांबा देण्याचा अधिकार वाहकाला आहे. त्यांना प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
विभागीय कार्यालयाकडून सूचना
एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विभागीय कार्यालयाने वाहक आणि चालकांवर विश्वास टाकला आहे. यानुसार अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार बसफेऱ्या ठरविण्याचे आणि थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ