पोलिसांचा भर आता जातीय सलोख्यावर

By Admin | Published: August 27, 2016 12:42 AM2016-08-27T00:42:14+5:302016-08-27T00:42:14+5:30

आगामी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजातील शांतता कायम रहावी यासाठी

Now the emphasis is on the ethnic cleansing of the police | पोलिसांचा भर आता जातीय सलोख्यावर

पोलिसांचा भर आता जातीय सलोख्यावर

googlenewsNext

कोल्हापूर : गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीच्या दणदणाटाऐवजी समाजकार्याची फुशारकी मारावी. सांगूनही जे ऐकत नाहीत त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारा, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे दिला.
जिल्हा पोलिस दलाच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी २०१५ चे गणराया अवॉर्ड वितरणप्रसंगी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील यांच्या हस्ते गणराया अवॉर्ड सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळास विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ज्या उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण सुरू केला. त्यात समाजप्रबोधनाचा हेतू होता. मात्र, सध्या हा हेतू लक्षात न घेता मंडळे या काळात उन्माद मांडत आहेत. त्यामुळे मंडळांनी डॉल्बीची नव्हे, तर समाजकार्याची फुशारकी मारली तर सणाचा आनंद आणखी द्विगुणित होईल. जी मंडळे डॉल्बी लावतील त्यांना कायद्याचा धाक दाखवा, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलिसांना दिला. हा सण मांगल्याचा असतो हे मुळातच युवापिढी विसरून गेली आहे. यावर्षी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ लोकमान्य टिळकांनी केलेल्या घोषणेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे डॉल्बीचा उन्माद मांडण्यापेक्षा टिळक कोण होते, त्यांचे कार्य आदींबद्दल माहिती मंडळांनी आजच्या पिढीसमोर मांडावी. या मंडळांना माझ्यातर्फे लोकमान्य टिळकांच्या शंभर प्रतिमा दिल्या जातील. गणेशोत्सव मंडळात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असे निर्भय वातावरण तयार होणे गरजेचे आहे. मंडळांनी यंदा डॉल्बीला फाटा देत समाजकार्य करावे. मिळणाऱ्या वर्गणीतून जास्तीत जास्त गरजूंना साहाय्य करा.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, सन १९१७ शाहू महाराज यांनीही या सणाच्या काळात शैक्षणिक कार्यासाठी एक लाखाची तरतूद केली होती. त्यातून अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली. त्याचप्रमाणे मंडळांनीही डॉल्बीला फाटा देऊन सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत करावी.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, मंडळांनी यंदा डॉल्बीमुक्ती करून कोल्हापूरकरांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, असे आवाहन केले.
महापौर अश्विनी रामाणे म्हणाल्या, डॉल्बीच्या काळ्या भिंती दूर करून पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, मर्दानी खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी केले.
यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, अप्पर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, आदी मान्यवरांसह सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा
उत्कृष्ट गणेशमूर्ती : मृत्युजन मित्र मंडळ (शनिवार पेठ), एकदंती गणेश मित्र मंडळ (घाटी दरवाजा जवळ), न्यू अमर मित्र मंडळ (नष्टे गल्ली, शनिवार पेठ),आत्मविश्वास मित्र मंडळ (द्रविड बोळ, महाद्वार रोड), सिद्धिविनायक मित्र मंडळ (उद्यमनगर).
उत्कृष्ट देखावा (तांत्रिक) : जयशिवराय मित्र मंडळ (उद्यमनगर), शाहूपुरी युवक मित्र मंडळ (शाहूपुरी), पाच बंगला मित्र मंडळ (शाहूपुरी), नंदी तरुण मंडळ (रंकाळा टॉवर).
उत्कृष्ट देखावा (संजीव) : छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ (पाटील गल्ली, बावडा), मित्रप्रेम तरुण मंडळ (ताराबाई रोड), उमेश कांदेकर युवा मंच (रंकाळा टॉवर). मनोरंजन तरुण मंडळ (वाडकर गल्ली, बावडा).
विधायक उपक्रम : प्रिन्स क्लब (मंगळवार पेठ), सम्राट मित्रमंडळ (चव्हाण गल्ली, बावडा), जय शिवराज तरुण मंडळ (उद्यमनगर), सर्वोदय मित्रमंडळ (रविवार पेठ).
समाज प्रबोधन : युवक मित्रमंडळ (राजारामपुरी), शिपुगडे तालीम मंडळ (जुना बुधवार पेठ), मृत्युंजय मित्रमंडळ (ज्ञानेश्वर मंडप, शनिवार पेठ), सोल्जर्स ग्रुप (तोरस्कर चौक).
शिस्तबद्ध मिरवणूक : तुकाराम माळी तालीम मंडळ
(मंगळवार पेठ).


पुरस्काराचे मोल टिकवून चांगले काम करा
कुणाल खेमनार : जिल्हा परिषदेतर्फे ‘शाहू’, ‘यशवंत सरपंच’, ‘आदर्श ग्रामसेवकां’चा गौरव
कोल्हापूर : ‘फक्त लढ म्हणा’ ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या नसानसांत भिनल्याने कौतुकाची थाप मारून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहित केले जाते; पण पुरस्काराचे मोल टिकवून त्यापेक्षा चांगले काम करण्याची जबाबदारी पुरस्कार विजेत्यांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात ‘राजर्षी शाहू गुणवंत कर्मचारी’, ‘यशवंत सरपंच’ व ‘आदर्श ग्रामसेवक’ या पुरस्कारांनी १५० हून अधिक जणांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
जिल्हा परिषदेने राज्य व देश पातळ्यांवर कामांच्या माध्यमातून ठसा उमटविला असून त्यामध्ये ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या पातळीपासून आदर्श काम झाल्याने जिल्हा परिषदेवर बक्षिसांची खैरात झाली. गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पातळ्यांवर तब्बल दीड कोटीची बक्षिसे जिल्ह्याने मिळविल्याचे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला बांधकाम सभापती सीमा पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती पाटील, समाजकल्याणच्या सभापती किरण कांबळे, पक्षप्रतोद शहाजी पाटील, ‘करवीर’च्या सभापती स्मिता गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, प्र्रकाश पाटील, सुजाता पाटील, मंगल वळकुंजे, प्रमोदिनी जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा परिषदेचे कर्मचारी आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर अनेकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)

लगेच बारसे करा, बरे वाटेल
पाहुण्यांच्या प्रतीक्षेत तीन वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुरस्कारांचे वितरण झाले नाही, हे चुकीचे असल्याचे सांगत, बाळ जन्माला आल्यानंतर लगेच बारसे झाले की जरा बरे वाटते.
तीन वर्षांनी वितरण झाल्याने त्याचा गोडवा कमी झाल्याचा चिमटा अरुण इंगवले यांनी काढला.

Web Title: Now the emphasis is on the ethnic cleansing of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.