पोलीस महासंचालकांच्या सर्व आस्थापना आता महिलांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:41 PM2019-06-03T12:41:17+5:302019-06-03T12:45:16+5:30
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयातील आयपीएस ते फौजदारापर्यंतच्या सर्व आस्थापना (कक्ष अधिकारी) आता महिलांकडे सोपविण्यात आल्या आहेत.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयातील आयपीएस ते फौजदारापर्यंतच्या सर्व आस्थापना (कक्ष अधिकारी) आता महिलांकडे सोपविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या आस्थापनांवर पुरुषांचे आणि त्यातही कोकणातील यंत्रणेचे वर्चस्व होते. परंतु महासंचालकांनी ते मोडित काढत सर्वांना समानसंधी असे धोरण अवलंबिले आहे. एकाच वेळी सर्व आस्थापना महिलांकडे देण्याचा महासंचालक कार्यालयाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग आहे.
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता अचानक महासंचालक कार्यालयात फेरफटका मारला. तेव्हा आस्थापना विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे (डेस्क आॅफीसर) राज्यातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली. ही गर्दी ‘भेटी-गाठी’साठी असल्याचे निष्पन्न झाल्याने महासंचालकांनी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी महासंचालक कार्यालयातील कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणेच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
त्यानुसार आता आयपीएस (डेस्क-१), पोलीस उपअधीक्षक (डेस्क-२), पोलीस निरीक्षक (डेस्क-३), सहायक निरीक्षक (डेस्क-४) व फौजदार (डेस्क-५) या सर्व प्रमुख आस्थापनांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील दोन नियुक्त्या आधीच करण्यात आल्या होत्या. अशाच पद्धतीने अनेक टेबल बदलविण्यात आले. वर्षानुवर्षे महासंचालक कार्यालयाच्या इमारतीत ठाण मांडून असलेल्या ‘मुक्कामी’ कर्मचाऱ्यांना यावेळी पहिल्यांदाच हलविण्यात आले. एसआरपीएफ, फोर्स-१, एसपीयू, गुप्तवार्ता आदी साईड ब्रँचला या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. महासंचालकांनी केलेला हा बदल अनेकांना धक्का देणारा तर बहुतांश दिलासा देणारा ठरला आहे.
महासंचालक कार्यालयातील आस्थापनांकडून राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक छळ केला जातो. क्षुल्लक कारणांसाठी त्यांना डीजी आॅफीसला येरझारा माराव्या लागतात. त्यातूनच ‘भेटी-गाठी’ संस्कृती फोफावते. हे प्रकार थांबविण्यासाठीच महासंचालकांनी स्वत: आपल्या कार्यालयातील बदल्यांमध्ये लक्ष घालून राज्यभरातील यंत्रणेला दिलासा दिला.
पोलिसांच्या बढत्या-बदल्याही पारदर्शक
फौजदार ते उपअधीक्षक पदापर्यंतच्या बढत्या व बदल्या लवकरच केल्या जाणार आहे. या सर्व बढत्या पारदर्शक पद्धतीने करण्याचा महासंचालकांचा प्रयत्न आहे.
आतापर्यंत महानिरीक्षक, अपर महासंचालकांच्या स्तरावर फाईलींवर दोन-तीन आठवडे निर्णय घेतला जात नव्हता. परंतु आता या फाईलीही वेगाने निकाली निघायला लागल्या आहेत.
यावर्षी पहिल्यांदाच पोलीस शिपाई ते सहायक फौजदारापर्यंतच्या सामान्य बदल्या (जीटी) ३१ मेपूर्वी झाल्या आहेत. सोईची बदली नाही झाली तरी चालेल, परंतु ती वेळेत व्हावी, असाच पोलिसांचा सूर असतो. वेळेत बदल्या झाल्याने पोलिसांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यभरातील पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक व अन्य बदल्याही आता ‘परफॉर्मन्स’ पाहून केल्या जाणार आहेत. राजकीय शिफारसी झुगारुन या बदल्या होणार आहेत. तसा स्पष्ट इशारा महासंचालकांनी यापूर्वीच बैठकांमधून या अधिकाऱ्यांना दिला आहे.