शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

By admin | Published: October 17, 2015 12:31 AM2015-10-17T00:31:23+5:302015-10-17T00:31:23+5:30

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन ...

Now the guests will welcome the book in schools | शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

Next

शिक्षण विभागाचा निर्णय : शासनाच्या आदेशावर वेगवेगळे मतप्रवाह
यवतमाळ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी काढले.
पुस्तक भेट देण्यामागे वाचनसंस्कृती वाढीस लागावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, अशा प्रकारचा हेतू यातून शासनाचा दिसून येतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारी कार्यालये, अकृषी विद्यापिठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये अशा ठिकाणी नियमितपणे मान्यवर व्यक्ती, अधिकारी आणि इतर सबंधित कामकाजाच्या निमित्ताने येत असतात. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांचे सर्वसाधारणपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा १५ आॅक्टोंबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा शाळा-महाविद्यालयांसह इतर अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी पहिला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकूणच वाचन संस्कृती व वाचन प्रेरणा वाढीस लागावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारे कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था येथे येणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा समारंभाप्रसंगी त्यांचे स्वागत पु्ष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके देऊन करण्यात येणार आहे.
शासनाच्या या आदेशाबाबत शैक्षणिक वर्तुळातच वेगवेगळे मत व्यक्त होत आहे. अनेकजणांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. केवळ पुस्तक भेट देऊन शासनाचा वाचन संस्कृतीस हातभार लावण्याचा हेतू साध्य होईल का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. शिवाय पुस्तक भेट देण्यासाठी आर्थिक तदतुदही करावी लागणार आहे. पुष्प भेट देण्यासाठी फारशी आर्थिक तरतूद करावी लागत नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत फुले उपलब्ध होतात. शिवाय मान्यवरांना दिलेले पुस्तक त्यांच्याकडून वाचले जाईलच, याची खात्री कोण देणार. अनेकजण केवळ कपाटात ठेवण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. नंतर मात्र ती पुस्तके धूळ खात पडतात. त्यांचा कोणालाही उपयोग होत नाही.
भेट देण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. तरच या निर्णयाचा हेतू साध्य होऊ शकेल. शाळा-महाविद्यालयांनी आलेल्या पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यापेक्षा आलेल्या पाहुण्यांनीच जर शाळेसाठी एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. कारण यामुळे संबंधित शाळेचे वाचनालय अधिक प्रगल्भ आणि समु्रद्ध होईल. अशा शाळेतील परिपूर्ण प्रगल्भ वाचनालयातील पुस्तकांचा फायदा त्या शाळेत सद्यस्थितीत आणि भविष्यात शिकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आपोआप मिळेल आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा किंबहुना ती वाढविण्याचा शासनाचा हेतू यशस्वी होईल, यात कोणतीही
शंका नसल्याचा एक मतप्रवाह दिसून येतो.
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाच्या या निर्णयापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात शाळांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तके व वृक्ष देऊन करण्यात येत आहे, तसे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेशच असल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाल्या. तसेच शासनाच्या या निर्णयाने आणखी जोमाने वाचन संस्कृती राबविण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शासनाचा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु यामध्ये केवळ पाहुण्यांनी शाळेकडून पुस्तक न घेता शाळेसाठीही नवनवीन वेगवेगळी पुस्तके घेऊन जावीत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसते, या माध्यमातून ते त्यांना मिळेल आणि ग्रामीण शाळांमधील वाचनालये समृद्ध बनतील, अशी प्रतिक्रिया माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम सुरू केला असून, तो यशस्वी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the guests will welcome the book in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.