आता जंगलात आग लावाल तर थेट तुरुंगात जावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:26+5:30
राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : वनसंपदेने नटलेल्या पांढरकवडा तालुक्यातील जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जैवविविधता धाेक्यात येते. मात्र, जंगलात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता वन विभागाने कंबर कसली आहे. जंगलात आग लावणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची तयारी वन विभागाने केली आहे.
पांढरकवडा वन विभागातील सर्वच क्षेत्रांत फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यांपासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वन कर्मचाऱ्यांना ‘जागते रहाे’च्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळरेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये काम करताना कचरा पेटवून दिला जाताे. गवत चांगले यावे यासाठी आग लावली जाते. वनातून जाताना बिडी, सिगारेट फेकली जाते. त्यामुळे आग लागून माेठे नुकसान हाेते. यापूर्वी या भागात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. वन कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एक वर्ष कारावास अन् पाच हजार रुपये दंड
राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाइट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते.
- किरण जगताप, उपवनसंरक्षक.