परीक्षेची चिंता घालविण्यासाठी शाळांमध्ये आता विपश्यनेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:51 PM2019-08-18T15:51:51+5:302019-08-18T15:54:00+5:30

विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत.

Now meditation lessons in schools for tension free exams | परीक्षेची चिंता घालविण्यासाठी शाळांमध्ये आता विपश्यनेचे धडे

परीक्षेची चिंता घालविण्यासाठी शाळांमध्ये आता विपश्यनेचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारसमता विभागाच्या उपक्रमासाठी शिक्षण आयुक्त आग्रही

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावी, बारावीचे विद्यार्थी प्रचंड चिंताग्रस्त असतात. निकालाच्या काळात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकारही पुढे येत आहेत. त्यामुळ विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची चिंता घालविण्यासाठी आता प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दररोज विपश्यना साधनेचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी आधी शिक्षकांनी विपश्यना साधना शिकावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकता यावे, याकरिता विद्या प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी ‘मित्र’ उपक्रम सुरू केला आहे. विद्या प्राधिकारणाच्या समता विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत आता विद्यार्थ्यांना विपश्यना साधना शिकविली जाणार आहे. ही ध्यान साधना विद्यार्थ्यांकडून दररोज करवून घेतली जाणार आहे. हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
आयुक्तांच्या निर्देशानुसार, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही साधना आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिक्षकांनी त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विद्या प्राधिकरणाच्या मित्र उपक्रमात आजवर १५ हजार शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. मात्र प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकाने विपश्येनेचे किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच शाळेत दररोज विद्यार्थ्यांकडून ही साधना करवून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी राज्य स्तरापासून तालुका स्तरापर्यंत या उपक्रमासाठी नोडल आॅफिसरही निश्चित केले आहेत. समता विभागाचे प्रमुख हे राज्य स्तरावर, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेचे प्रमुख हे जिल्हास्तरावर तर पालिकेचे प्रशासन अधिकारी तसेच गट साधन केंद्राचे समन्वयक हे तालुका पातळीवरील नोडल आॅफिसर आहेत. लवकरच शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळांमधून दररोज १०-१० मिनिटांची विपश्यना साधना सुरू होण्याची शक्यता आहे.

विपश्यनेने होणारे फायदे
परीक्षेची काळजी, चिंता विद्यार्थी पूर्ण आत्मविश्वासाने हाताळू शकतात.
या साधनेच्या दैनंदिन सरावाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते.
मनाची जागृती, सतर्कता वाढते.
स्वयंशासन, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता वाढते.
भीती, राग, चिड, उदासीनता कमी होते.
अभ्यास आणि खेळासह इतरही उपक्रमांमध्ये सहभाग वाढतो.
शिक्षकांमध्येही उत्साह वाढतो. शिक्षक-विद्यार्थी स्नेहभाव वाढतो.

Web Title: Now meditation lessons in schools for tension free exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.