एसटी कर्मचाऱ्यांच्या 'ओटी'चा आता नो ब्रेकडाऊन
By विलास गावंडे | Published: February 24, 2024 10:37 PM2024-02-24T22:37:17+5:302024-02-24T22:37:49+5:30
वाहतूक महाव्यवस्थापकांचे आदेश : रोजंदार कर्मचाऱ्यांची सलग कामगिरीही थांबणार
विलास गावंडे, यवतमाळ : कामाच्या तासापेक्षा अधिकवेळ कामगिरी करून घेतल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला दिला जात नाही. महामंडळाच्या काही विभागातील या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. ही बाब एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी गांभीर्याने घेतली आहे. अतिरिक्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्याचे आदेशच त्यांनी जारी केले आहेत.
मोटार वाहन कायद्याच्या कलम १३ नुसार चालक-वाहकांची आठ तासांपेक्षा अधिक वेळ कामगिरी झाल्यास ओव्हर टाईम दिला जातो. महामंडळात चालक-वाहकांचा तुटवडा असल्याने अनेक कर्मचाऱ्यांकडून जादा कामगिरी करून घेतली जाते. तरीही त्यांना ओव्हर टाईमचा लाभ दिला जात नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. दहा ते बारा तास काम करूनही या श्रमाचा मोबदला मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये महामंडळाच्या भूमिकेविषयी रोष व्यक्त होत आहे.
महामंडळाच्या काही विभागात रोजंदार गट क्रमांक-१ पदावर काम करणाऱ्या चालक-वाहकांना तर साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. सलग तीन-तीन दिवस त्यांच्याकडून कामगिरी करून घेतली जाते. तरीही त्यांना ओव्हर टाईमचा लाभ दिला जात नाही. या सर्व बाबींविषयी कर्मचारी आणि कामगार संघटनांनी वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल केल्या आहेत. याचीच दखल वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे. ओव्हर टाईम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला तातडीने द्यावा, अशा सूचना त्यांनी महामंडळाच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.
इन्क्रिमेंट वाढीचाही लाभ नाही
चालक, वाहकांच्या इन्क्रिमेंटमध्ये ज्या महिन्यात वाढ झाली त्या महिन्याच्या वेतनश्रेणीनुसार ओव्हर टाईमचा लाभ दिला जात नाही. एक-दोन महिने विलंबाने वाढीव इन्क्रिमेंटनुसार अतिकालिक भत्ता काढला जातो. त्यामुळे श्रम करूनही जुन्याच वेतनश्रेणीनुसार ओव्हर टाईमचा लाभ मिळतो. याविषयी सुद्धा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा केला आहे. नियमानुसार हा लाभ देण्यात यावा, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
रोजंदार कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या
एसटी महामंडळातील रोजंदार गट क्र.१ वरील चालक-वाहकांना सहा दिवसांच्या कामगिरीनंतर आठवडी सुट्टी देण्यात यावी. शिवाय, ब्रेकडाऊन, रस्त्यावरील अडथळे, वाहतुकीची कोंडी आदी कारणांमुळेही चालक, वाहकांना जादा कामगिरी करावी लागली असल्यास नियमानुसार ओव्हर टाईमचा लाभ दिला जावा, असे वाहतूक महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.