आता दुकानांचे शटर दुपारीच होणार डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 05:00 AM2021-04-19T05:00:00+5:302021-04-19T05:00:06+5:30
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोेरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, त्यातही अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुकानांच्या या वेळा आणखी कमी करण्यात आल्या आहेत. आता ही दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत. दुकानांच्या वेळेबाबतचा हा नियम मोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमभंग होईल तेथेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हा आदेश १९ एप्रिलपासून १ मेच्या सकाळपर्यंत लागू राहणार आहे.
संचारबंदी असूनही नागरिक अत्यावश्यक कामांच्या नावाखाली शहरात फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या दुकानांची वेळही कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या कमी केलेल्या कालावधीत वर्दळ व गर्दी टाळण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडण्याची गरज आहे.
किराणा, भाजीपाला विक्रीवर मर्यादा
संचारबंदीत किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळविक्री या सेवांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळेच ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. मात्र, आता सोमवारपासून या अत्यावश्यक दुकानांची वेळ दुपारी २ पर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. मात्र, दूध संकलन केंद्र, दुधाचे घरपोच वितरण तसेच हॉटेलमधून पुरविली जाणारी पार्सल सेवा यांच्यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ हीच वेळ कायम ठेवण्यात आली आहे.
या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील
पेट्रोलपंप, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपालसेवा केंद्र, रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, वाहतूक व्यवस्था, पशुवैद्यकीय दवाखाने, त्यांच्या औषधांची दुकाने आदी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ ही वेळेची मर्यादा या सेवांना लागू नाही.