आता आधार चापडोहचा
By admin | Published: April 19, 2016 06:04 AM2016-04-19T06:04:59+5:302016-04-19T06:04:59+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात उन्हाळयात विषमता निर्माण होते. निळोणा आटते तर चापडोह निम्माच असतो. या स्थितीत आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. यावर मात करण्यासाठी चापडोह प्रकल्पावर अतिरिक्त शुध्दीकरण केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. हे केंद्र अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जून अथवा जुलैमध्ये यवतमाळकरांच्या सेवेत येणार आहेत. तोपर्यंत यवतमाळकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
चापडोह प्रकल्पाची क्षमता १३ दशलक्ष घनमीटर आहे. निळोणा प्रकल्पाची क्षमता ६.१९ दशलक्ष घनमीटरची आहे. निळोणाच्या तुलनेत चापडोह दुप्पट आहे. यामुळे या प्रकल्पात अधिक जलसाठा असतो. उपलब्ध पाणी वापरण्यासाठी शुध्दीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. योकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभारावे लागते. त्या ठिकाणी पाण्याच्या साठवणुकीसोबतच प्रक्रियेसाठी १८ तास लागतात.
चापडोह प्रकल्पावर उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता एक कोटी ४५ लाख लिटरची आहे. असे असतानाही पाणी तुटवड्यामुळे या ठिकाणी २२ तास पंपिंग करून एक कोटी ६० लाख लिटर पाण्याचे शुध्दीकरण केले जाते. हे पाणी यवतमाळकरांच्या दृष्टीने अपुरे आहे. पाण्याचा साठा पाहता आणखी ५० लाख लिटर अतिरिक्त पाण्याचे शुध्दीकरण गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती गरजेची होती. यासाठी प्राधिकरणाने जलशुध्दीकरण केंद्राचे काम दोन वर्षांपासून हाती घेतले आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर निळोणा आणि चापडोह प्रकल्पात निर्माण होणारी पाण्याची विसंगती टळणार आहे. दोन अथवा तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याचा पेच सुटण्यास मदत होणार आहे. हा उन्हाळा यवतमाळकरांना जड जाणार असला तरी, पुढील वर्षीमात्र दिलासा मिळेल, अशी आशा आहे. (शहर वार्ताहर)
निळोणावर चार वर्षांनंतर ‘इमर्जन्सी’
४यवतमाळ : निळोणा जलाशयातील पाणी संपल्याने या ठिकाणी तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले. मंगळवारी या पंपाच्या मदतीने पाणी ओढण्याची चाचणी घेतली जाणार आहे. बुधवारपासून या क्षेत्रातून २२ तास पाणी उपसले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांचा पाणी प्रश्न सोडविला जाणार आहे. सन २०१२ मध्ये निळोणा प्रकल्पाने तळ गाठल्याने इमर्जन्सी पंप बसविण्यात आले होते. त्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यानंतर तब्बल चार वर्षाने निळोणा प्रकल्पात तीन इमर्जन्सी पंप बसविण्यात आले आहे. डेडवॉटर शुध्द करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागणार आहे. त्या दृष्टीने जीवन प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. क्लोरीन आणि तुरटीचा उपयोग करून पाणी शुध्द केले जाणार आहे. यातुन यवतमाळकरांना शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे.