इंग्लिश-देशी दारूवर आता गावठीचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:14+5:30
लॉकडाऊनचा कालावधी वाढेल, या भितीपोटी तर अनेक मद्यपींनी एकाचवेळी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला. मात्र तोही फार दिवस पुरला नाही. त्यामुळे आता या सराईत मद्यपींनी गावठी दारू उतारा म्हणून शोधली आहे. १८० मिली गावठी दारूची किंमत केवळ २० रूपये होती. परंतु दारूचा तुटवडा लक्षात घेता, आता हीच गावठी दारू २०० रूपयाला विकली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी : गेल्या एक महिन्यांपासून मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने इंग्लिश व देशी दारूवर मोहापासून बनविलेली गावठी दारू उतारा ठरत आहे. दारूची वाढती मागणी लक्षात घेता झरी तालुक्यातील घनदाट जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळली जात असून हे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
एरव्ही व्हिस्की किंवा वाईन पिणाऱ्यांची बंदमुळे मोठी अडचण झाल्याने आता या सराईत मद्यपींनी ‘गावठी’चा मार्ग पत्करला आहे. मोहापासून बनविलेली गावठी दारू आरोग्यासाठी किती चांगली आहे, याचे दाखलेही या सराईत मद्यपींकडून दिले जात आहे. असे असले तरी ही दारू आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एक महिन्यांपासून सर्वच दारू दुकानांना टाळे लागले आहेत. कोरोनामुळे दारू दुकाने बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही महाभागांनी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर काढून ठेवला होता. परंतु मागणी लक्षात घेता, हा दारूसाठी अल्पकाळातच संपुष्टात आला.
बंददरम्यान साधारणत: दुप्पट दरात विकल्या जाणाºया दारूचा भाव लॉकडाऊनच्या काळात १५ दिवसातच चौपट झाला. वाईन शॉपमधून १५० रूपयांमध्ये मिळणारी दारूची बाटली लॉकडाऊनच्या काळात ८०० ते एक हजार रूपयाला विकली गेली आणि धक्कादायक म्हणजे सराईत मद्यपींनी त्या भावात ती खरेदीही केली. लॉकडाऊनचा कालावधी वाढेल, या भितीपोटी तर अनेक मद्यपींनी एकाचवेळी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला. मात्र तोही फार दिवस पुरला नाही. त्यामुळे आता या सराईत मद्यपींनी गावठी दारू उतारा म्हणून शोधली आहे. १८० मिली गावठी दारूची किंमत केवळ २० रूपये होती. परंतु दारूचा तुटवडा लक्षात घेता, आता हीच गावठी दारू २०० रूपयाला विकली जात आहे.
झरी तालुक्यातील जंगलाच्या आडोशाने देशी दारूच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणावर पेटविल्या जात असून या दारूची विक्रीही घरपोच केली जात असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत आहे. वणी परिसरातील अनेक मद्यपींनी आता मोहापासून बनविलेल्या गावठी दारूसाठी झरीची वाट पकडली आहे.
उमरीत गावठी दारूची खुलेआम विक्री
पांढरकवडा : लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे. काही शौकीन महाभाग १० रूपयांचा ग्लास ६० रूपयाला घेऊन आपला व्यसन पूर्ण करित असल्याचे दिसून येत आहे. उमरी येथील यार्डी शाळेकडे जाणारा रस्ता या मंडळीचा ठिय्या बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बॉटल, सिगारेटची पाकीटे पहायला मिळत आहे. हातभट्टीची दारू पाण्याच्या बाटलीत आणून घोळक्यात बसून पार्टी करण्यात येत आहे. ही जागा आतमध्ये असून तिकडे कुणाला दिसणार नाही, म्हणून या मद्यपींनी तेथे आपला अड्डा बनविला आहे. उमरी वखारातील कर्मचारी व चौकीदारांनी त्यांना वारंवार हटकले असता, आम्ही तुमच्या डेपोत बसा, असे प्रत्युत्तर दिले जात आहे.