आता निळोणा जलाशयातच घेतला जातो पाण्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:11 PM2018-05-13T22:11:36+5:302018-05-13T22:11:36+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. तशा पाच पॉइंटचा निळोणा क्षेत्रात शोध घेण्यात आला आहे. यामध्ये निळोणा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीचा शोध लागला आहे.
निळोणा जलाशयाचे क्षेत्र क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सपाट झाले. हे क्षेत्र टोळगोटे आणि फॅक्चर रॉकने व्यापले आहे. अशा ठिकाणी पाण्याचा सोर्स असतो. पाणी ताशी १० हजार लिटर प्रवाह बाहेर सोडेल, अशा मुबलक जलसाठ्याचा शोध भूजल सर्वेक्षण विभागाने सुरू केला आहे. धरणाच्या क्षेत्रात त्यासाठी पाच पॉर्इंट निवडले आहे.
यामध्ये एक मुबलक पाण्याची विहीर आहे. त्यातून पाणी हाताने काढता येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. या विहिरीला स्वच्छ करून त्यावरून पाणी भरता येईल, काय याचा विचार करण्यात येत आहे. इतर पॉइंटवर ताशी १० हजार लिटर पाणी बाहेर पडल्यास टँकर भरणे सोपे होणार आहे. शहराच्या दृष्टीने हे अंतर सर्वात कमी राहणार आहे.
सीओंकडून पाहणी
शहरातील पाण्याचे स्त्रोत अपुरे पडत आहे. यामुळे मुबलक पाण्याच्या विहिरींचा शोध घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी दिले होते. मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी त्या दृष्टीने शनिवारी दिवसभर जलस्त्रोतांची पाहणी केली.