‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:24 PM2018-04-11T23:24:24+5:302018-04-11T23:24:24+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पुढाकरात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण तथा शहरी भागात आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कंत्राटदारांना घरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. शासनाने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली. समान काम-समान वेतन, नियमित कर्मचाºयांना लागू असलेल्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मानव संसाधन संदर्भात असलेले योजनानिहाय मूल्यांकन ही किचकट प्रक्रिया रद्द करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीमा संरक्षण लागू करावे, सद्यस्थितीतील अभ्यास समितीने पुढाकार घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे, जिल्हा व तालुकास्तरीय बदलीबाबतचे निर्बंध हटावावे आदी मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहे. दरम्यान राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश वड्डेवार, उपाध्यक्ष सचिव बोपचे, आकाश तिवारी, कोषाध्यक्ष मकरंद लोहकरे, कार्याध्यक्ष डॉ.अमोल राठोड, सचिव गोपाल इसोकर आदी सहभागी झाले आहेत.