गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:34 PM2018-12-29T23:34:43+5:302018-12-29T23:35:18+5:30
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. २०१७ मध्ये जिल्ह्यात पाच हजार ३७६ गुन्हे नोंदविले गेले होते.परंतु यावर्षी हा आकडा ४३२ ने कमी होऊन ४९४४ पर्यंत खाली आला आहे. याच आधारावर जिल्ह्यात गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, जबरी संभोग, जबरी चोरी, घरफोड्या, सायकल चोरी, ट्रक चोरी, कार-जीप चोरी, अन्य चोऱ्या, शेती अवजारे, खिसेकापू, दुखापत, दंगा, अफरातफर, अनधिकृत गृहप्रवेश, अपक्रिया, हुंडाबळी या सारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली. तर दरोडा, दरोड्याची तयारी, इलेक्ट्रीक वायर चोरी, जनावर चोरी, वाहन चोरी, वाहनांचे सुटे भाग, फसवणूक, पळवून नेणे, शासकीय कर्मचाºयांवर हल्ला, विनयभंग, नवविवाहितांची आत्महत्या, इतर आत्महत्या, विवाहितांचा विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ या गुन्हे प्रकारात मात्र किंचित वाढ झाली असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी उपस्थित होते.
चार पोलिसांचा मृत्यू
गेल्या वर्षभरात नेर येथे दोन तर लोहारा व मुकुटबन येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर मारेगाव ठाण्यातील एका सहायक फौजदाराच्या खुनाची घटना घडली.
२५ रिव्हॉल्वर जप्त
गेल्या वर्षभरात पोलिसांनी अग्नीशस्त्राचे ११ गुन्हे नोंदविले आहे. त्यात २४ जणांंना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे २५ अग्नीशस्त्रे, ४८ काडतूस जप्त करण्यात आले. शिवाय चाकू, गुप्ती, तलवार, जांबिया या सारख्या घातक शस्त्राचे ४१ गुन्हे नोंदवून ५६ जणांना अटक करण्यात आली. या शस्त्राची किंमत ४ लाख ५७ हजार ८७५ रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.
नववर्षासाठी तगडा बंदोबस्त
३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत उत्साहात मात्र शांततेने व नियमात राहून करावे, असे आवाहन एम. राज कुमार यांनी केले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा २४ तास वॉच राहील. लहान मुलांना पालकांनी वाहने देऊ नये, प्रत्येकाने रहदारीचे नियम पाळावे. ३१ डिसेंबरसाठी जिल्हाभर ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहनांची, वाहनधारकांची तपासणी केली जाणार असल्याचे एसपींनी सांगितले.