खात्यांतर्गत फौजदारांच्या ज्येष्ठता यादीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:48 AM2018-06-20T04:48:42+5:302018-06-20T04:48:42+5:30
तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे.
- राजेश निस्ताने
यवतमाळ : तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे.
गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालक कार्यालयाने खात्यांतर्गत फौजदार परीक्षेतून पात्र ठरलेल्या १६ हजार पोलीस कर्मचा-यांची अस्थायी यादी जारी केली. त्यात प्रचंड चुका आहेत. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत आहेत. कित्येक कर्मचाºयांच्या नियुक्तीच्या व जन्मतारखा चुकविण्यात आल्या आहेत. यादीतील अनेक कर्मचारी या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.
कित्येक कर्मचा-यांची नावे गहाळ आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस दलातील सव्वादोनशे कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण झाले असताना एकाचेही नाव यादीत नाही. या यादीवर आता ३० जूनपर्यंत आक्षेप मागविले आहेत. त्यानंतर, ही यादी अंतिम केली जाईल. राज्याच्या विविध भागांतून या यादीवर आक्षेप घेण्यात येत असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात आले.