रस्ता बांधकामात खांबांचा अडथळा; दुसऱ्या बाजूचेही काम सुरू होणार : वीज खांबांच्या तारा आल्या जमिनीपासून सहा फुटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:48 AM2021-08-17T04:48:02+5:302021-08-17T04:48:02+5:30
गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या ज्या बाजूचे काम पूर्णत्वाकडे आहे, त्या बाजूला असलेल्या वीज खांबांवरील तारा जमिनीपासून केवळ पाच ते ...
गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या ज्या बाजूचे काम पूर्णत्वाकडे आहे, त्या बाजूला असलेल्या वीज खांबांवरील तारा जमिनीपासून केवळ पाच ते सहा फुटावर असून या तारांतून २४ तास वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे एखादे वाहन या तारांना घासून गेल्यास मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. सध्या ज्या भागातून वाहतूक सुरू आहे, त्याही रस्त्याचे काम अगदी लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे त्या भागातून होणारी वाहतूक बंद करून, ज्या बाजूचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या बाजूने वाहतूक सुरू करावी लागणार आहे. मात्र काम पूर्ण झालेल्या बाजूच्या रस्त्यावर अगदी मधोमध विजेचे खांब उभे आहेत. ते हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वीज वितरण कंपनीला यापूर्वी अनेकदा पत्र दिले. मात्र त्या पत्राचा कोणताही परिणाम वीज वितरण कंपनीवर झाल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील वीज खांबांची पाहणीदेखील केली होती. मात्र त्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्याचे दिसत नाही. यासंदर्भात वणी येथील बांधकाम उपविभागाचे अभियंता तुषार परळीकर यांना विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांशी या विषयात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. वीज खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे, असे परळीकर यांनी सांगितले.
बॉक्स:
वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिकांना मनस्ताप
वणी-यवतमाळ मार्गावरील साईमंदिर चौक ते चिखलगाव रेल्वेगेटपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. एका बाजूने हे बांधकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहने ये-जा करीत आहेत. अनेकदा या मार्गाने जड वाहनेदेखील ये-जा करतात. त्यात त्याच बाजूने अनेक दुकाने असल्याने दुकानांपुढे दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आहे.