अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:15 AM2017-11-30T00:15:03+5:302017-11-30T00:15:51+5:30
नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/चिकणी (जामणी) : नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरविला आहे. जामणी येथील शेतकऱ्यानेही वेचणीलाही कापूस परवडत नसल्याने शेतात गुरे सोडलीत.
जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी तथा बोंडअळीने हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण बोंडेच किडली आहेत. यात फुटलेला कापूस वेचण्यासही शेतमजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना कापूस न वेचताच उलंगवाडी करावी लागत आहे. वर्धा तथा देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव तसेच परिसरातील कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रकोप दिसून येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाला तोंड देत अहोरात्र श्रम करून कपाशी पीक जपले; पण बोंडअळीच्या प्रकोपामुळे हातचे पीक गेले आहे. बोंडअळीचा फटका देवळी तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी अतुल राऊत याला बसला. अतुलने २८ मे रोजी प्री मान्सून बिटी कपाशीची दोन एकरात लागवड केली. यावर याने ४० हजार रुपये खर्च केला. कपाशीचे पीक चांगले बहरले. चांगले उत्पन्न होईल, अशी आशा होती. बोंड भरत असताना बोंडअळीचा हल्ला झाला. यात कपाशीची बोंडे किडली. कापूसही किडक निघत आहे. यंदा केवळ दोन क्विंटल कापूस निघाला. याच शेतात मागील वर्षी ३२ क्विंटल कापूस झाला होता. मजूरही कापूस वेचण्यास तयार नाही. यामुळे नाईलाज म्हणून पिकातच गुरे सोडावी लागली. यात खर्चही व्यर्थ गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
स्वत: शेताची पाहणी केली. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे बोंडे किडली असल्याने कापूस निघणार नाही. अर्ज भरण्यास सांगितले आहे. शासनाकडून किती मदत होईल, हे सांगणे कठीण नाही. शेतकऱ्यांना बीटी कपाशीची लागवड करताना काही अंतरावर नॉन बिटी लावावी. यामुळे बीटी कपाशीच्या बोंडावर हल्ला झाला नसता.
- व्ही.एस. खैरकार, कृषी सहायक, मंडळ सोनेगाव (आ.).
अळ्यांमुळे भीतीचे वातावरण
हिंगणी - गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहे. येथील युवा शेतकरी स्रेहल पोकळे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कष्टाने जपलेल्या पिकांवर महागडी फवारणी केली; पण कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते. यामुळे शेतकरी फसतात. बोंडअळी, पाने कातरणारी अळी, लाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी भरपाईची मागणी शेतकºयांकडून होत आहे.