‘ओएफसी’चे खोदकाम वृक्षांच्या ‘मुळा’वर
By admin | Published: July 6, 2017 12:34 AM2017-07-06T00:34:52+5:302017-07-06T00:34:52+5:30
इंग्रजांच्या काळापासून राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूंनी डौलाने उभे असलेले वृक्ष गत काही दिवसात लहान-सहान वादळातही उन्मळून पडत आहे.
वृक्ष उन्मळण्याच्या घटना : राज्य मार्गावरील शतकोत्तरी झाडे नष्ट
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इंग्रजांच्या काळापासून राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूंनी डौलाने उभे असलेले वृक्ष गत काही दिवसात लहान-सहान वादळातही उन्मळून पडत आहे. गर्द सावली देणाऱ्या या वृक्षांच्या मुळावर राज्य मार्गालगत विविध कंपन्यांच्या ‘ओएफसी’चे (आॅप्टीकल फायबर केबल) खोदकाम उठले आहे. अगदी रस्त्याच्या हद्दीतच जेसीबीद्वारे खोदकाम होत असल्याने त्याची ईजा वृक्षांच्या मुळांना पोहोचत आहे. गत काही दिवसात एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच विविध राज्य मार्गावर शेकडो वृक्ष यामुळेच उन्मळून पडली असून अशीच स्थिती राज्यात सर्वत्र विविध मार्गांवर आहे.
गत महिनाभरात जिल्ह्यात झालेल्या वादळात राज्य मार्गावरील अनेक वृक्ष उन्मळून पडली. काही वर्षापूर्वी वादळात झाडाच्या फांद्या तेवढ्या तुटून पडत होत्या. परंतु आता मोठे घेर असणारे वृक्षही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे साध्या वादळात उन्मळत आहे. मुळासह वृक्ष उन्मळून पडत आहे. शंभर वर्ष झालेली अनेक वृक्षे लहान-सहान वादळात जमीनदोस्त झाली आहे. पूर्वी यापेक्षाही मोठे वादळ यायचे. परंतु तेवढी हानी होत नव्हती. मात्र गत पाच वर्षात वृक्ष उन्मळण्याच्या घटनात मोठी वाढ झाली. या मागील मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या दोन्हीबाजूला विविध टेलिकॉम कंपन्यांचे ‘ओएफसी’ केबलसाठी केलेले खोदकाम होय. टेलिकॉम कंपन्या केबल टाकण्यासाठी दीड ते दोन मीटर खोलीच्या नाल्या खोदतात. यात झाडांना पोषक तत्व देणारी मुळं नष्ट होतात. हे खोदकाम दर सहा महिन्यानंतर सातत्याने कोणत्या कोणत्या टेलिकॉम कंपनीकडून केले जाते.
विदर्भातील प्रत्येक राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला विविध कंपन्यांनी ‘ओएफसी’चे जाळे टाकले आहे. केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जाते. अनेक मार्गावर अगदी रस्त्यालगतच खोदकाम होत आहे. खोदकाम करताना वृक्षांच्या अगदी जवळूनच खोदकाम होते. त्यात मोठ्या प्रमाणात मुळ्या तुटतात. परंतु त्याचे कुणालाही देणे-घेणे नसते. एका बाजूला डांबरी सडक असल्याने त्या बाजूला मुळ्यांची वाढ होत नाही. तर दुसऱ्या बाजूला खोदकामामुळे भुसभुसीत जमीन झाली आहे. यवतमाळ-दारव्हा, अमरावती, आर्णी, नागपूर यासह विविध मार्गावर असे खोदकाम झाल्याने वृक्षांच्या मुळ्या उघड्या होऊन लहान वादळातही वृक्ष उन्मळून पडत आहे. सुदैवाने अशी मोठी घटना घडली नाही. परंतु भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.
वृक्षारोपणाचा गाजावाजा
एकीकडे चार कोटी वृक्ष लागवडीचा शासन गाजावाजा करीत आहे. ठिकठिकाणी जनजागृती करीत आहे. मात्र जी झाडे राज्य मार्गावर आहे. ती झाडे एक तर रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जात आहे. अथवा ‘ओएफसी’च्या खोदकामाने उन्मळून पडत आहे. शासनाने जुन्या झाडांच्या संवर्धनासाठी उपाययोजण्याची गरज आहे. रस्त्यालगत खोदकाम करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात.