संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात

By विशाल सोनटक्के | Published: September 22, 2023 01:10 PM2023-09-22T13:10:43+5:302023-09-22T13:12:59+5:30

लोकसभा निवडणूक : यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या सर्वेनंतर भाजप पक्षश्रेष्ठींचा थेट मुख्यमंत्र्यांना संदेश

Offer to Sanjay Rathod; Otherwise BJP will contest the fray Yavatmal-Washim Lok Sabha elections | संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात

संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात

googlenewsNext

विशाल सोनटक्के

यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने त्यांच्या विश्वासू संस्थेच्या माध्यमातून लाेकसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात यवतमाळसह राज्यातील शिंदे गटाचे चार खासदार यांना लोकसभेची निवडणूक अडचणीची असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाला आहे. त्यामुळेच भाजपने आता शिंदे गटाला जागा हवी असल्यास त्यांनी विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांना मैदानात उतरवावे, ते तयार न झाल्यास यवतमाळ-वाशिम लोकसभेची निवडणूक भाजप लढवेल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. या नव्या घडामोडीमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून भाजप या मतदारसंघामध्ये यंत्रणा राबवित आहे. तसेच विविध सर्व्हेच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा नेमका मूड काय आहे, याचाही अंदाज घेत आहे. याचाच भाग म्हणून पुण्यातील एका संस्थेच्या माध्यमातून भाजपने लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले असता यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराला अँटी इन्कम्बन्सी आणि तुटलेल्या जनसंपर्काचा मोठा फटका बसू शकतो, हे पुढे आले आहे. या सर्वेक्षणानंतर भाजपची यंत्रणा सतर्क झाली आहे. भाजपने शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तुम्हाला यवतमाळ लोकसभेची जागा हवी असेल तर संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी लागेल आणि ते उमेदवारीसाठी तयार न झाल्यास ही जागा भाजप लढवेल, असे स्पष्ट सांगितल्याचे समजते.

पालकमंत्री संजय राठोड लाेकसभेच्या मैदानात उतरल्यास महाविकास आघाडीच्या विरोधात ते तगडे उमेदवार राहू शकतात. मात्र, पालकमंत्री संजय राठोड यांचे राज्याच्या राजकारणात राहण्यालाच प्राधान्य असल्याचे समजते. त्यामुळे ही जागा आता भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडे आमदार नीलय नाईक आणि आमदार मदन येरावार हे दोन पर्याय सध्या तरी दिसत आहेत. यापैकी नीलय नाईक लोकसभेच्या मैदानात उतरविले जाण्याची शक्यता जास्त आहे. हा मतदारसंघ बंजाराबहुल आहे. त्यातच जिल्ह्याच्या राजकारणावर मागील ७५ वर्षांपासून पुसदच्या नाईक घराण्याचा दबदबा आहे. नाईक यांना उमेदवारी दिल्यास यवतमाळ मतदारसंघासह मराठवाड्यातील काही मतदारसंघातही भाजपला फायदा होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. विशेष म्हणजे, नाईक घराण्याचा वारसा सांगणारे नीलय नाईक यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास सध्या भाजप मित्रपक्षासोबत असलेल्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक यांचाही एकमुखी पाठिंबा नीलय नाईक यांना मिळू शकतो.

सहापैकी चार मतदारसंघ भाजपकडे, मग जागा का सोडायची?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ मागील २४ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, यावेळी राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलटफेर झालेले आहेत. याचे पडसाद यवतमाळमध्येही उमटलेले आहेत. सद्य:स्थितीत यवतमाळ (मदन येरावार), राळेगाव (अशोक उईके), वाशिम (लखन मलिक) आणि कारंजा (राजेंद्र पाटणी) हे चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत, तर संजय राठोड यांच्या रूपाने दारव्हा-दिग्रस मतदारसंघ भाजप मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाकडे आहे. तर इंद्रनील नाईक यांचा पुसद मतदारसंघही अजित पवार गटाच्या माध्यमातून भाजपसोबतच असल्याने हा मतदारसंघ का सोडायचा, असा विचार भाजपश्रेष्ठी करीत आहेत.

संघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली खदखद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील ३६ संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पुणे येथे झाली. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला भाजपने सोबत घेतल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

महाविकास आघाडीकडून काँग्रेस की शिवसेना लढणार

लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराची थेट लढत महाविकास आघाडी म्हणजेच आता नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीशी होणार आहे. यापूर्वी या मतदारसंघातून शिवसेना उमेदवाराला सातत्याने कौल मिळत राहिलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट ही जागा आपल्या पक्षाकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षही यवतमाळ मतदारसंघासाठी आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेससाठी जागा सुटल्यास माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांची नावे पुढे येतात. त्यातही माणिकराव ठाकरे यांच्यावर काँग्रेसने तेलंगणाची जबाबदारी सोपविलेली आहे. अशा स्थितीत माजी मंत्री वसंत पुरके यांचेही नाव काँग्रेसकडून पुढे केले जाऊ शकते.

Web Title: Offer to Sanjay Rathod; Otherwise BJP will contest the fray Yavatmal-Washim Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.