आरटीओ कार्यालयात अधिकारी-लिपिकात 'तू-तू-मैं-मैं'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 02:56 PM2021-12-05T14:56:29+5:302021-12-05T15:03:14+5:30
अधिकारी नवखा आल्यानंतर काही कर्मचारी आपल्यातील सुप्त गुण दाखविण्याचा प्रयत्न करतात. अधिकार नसतानाही कर्मचारी अधिकाऱ्यांना डावलून कारभार चालविण्याचा प्रयत्न करतात.
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून प्रभारीवर आहे. सहायक परिवहन अधिकारी यांच्याकडेच उपप्रादेशिक अधिकाऱ्याचा प्रभार आहे. नव्याने आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद नसल्याचे दिसते. यावरूनच शुक्रवारी ४.३० वाजता अधिकारी व लिपिकात तू-तू-मैं-मैं झाली.
अधिकारी नवखा आल्यानंतर काही कर्मचारी आपल्यातील सुप्त गुण दाखविण्याचा प्रयत्न करतात. अधिकार नसतानाही कर्मचारी अधिकाऱ्यांना डावलून कारभार चालविण्याचा प्रयत्न करतात. यात माहीर असलेल्या आरटीओ कार्यालयातील एका लिपिकाची ही कामाची पद्धत नव्या अधिकाऱ्याला खटकली. बऱ्याचदा मौखिक सूचनाही देण्यात आल्या. नियमात राहूनच कामे करावी, परस्पर अधिकाराचा वापर करु नये अशी समज देण्यासाठी ते अधिकारी थेट आपला कक्ष सोडून त्या लिपिकाच्या टेबलवर पोहोचले; मात्र त्या लिपिकानेही अहंभाव दाखवत अधिकाऱ्याला उलट उत्तरे दिली. यामुळे या अधिकाऱ्याचा चांगलाच पारा चढला.
आपली चूक झाली हे लक्षात येताच लिपिकाने माघार घेतली. नंतर तो भावनिक झाल्याचे भासवून डोळे पुसू लागला. यावेळी अधिकारी म्हणून माझी काही जबाबदारी आहे, ती मलाच पार पाडावी लागते. सहकारी म्हणून तुम्ही सोबत असणे आवश्यक आहे; मात्र अपरोक्ष थेट अधिकाराचाच वापर करणे किंवा डावलणे ही बाब चुकीची असल्याचे त्या अधिकाऱ्याने उपस्थितांना सांगितले.
प्रशासकीय घडी विस्कटली
आरटीओ कार्यालयातील काही महाभागांनी नवख्या अधिकाऱ्याला जुमानायचे नाही, अशी भूमिका घेतली, त्यातही प्रभारी अधिकारी असल्याने आपले काय बिघडणार असा समज करून घेतला. त्यामुळेच प्रभारी अधिकाऱ्याला डावलून कारभार करण्याचा प्रयत्न सुरू केला. शिवाय कार्यालयीन वेळाही या महाभागांकडून पाळल्या जात नाही. आरटीओतील कामाची पद्धत सर्वसामान्यांमध्ये बदनाम आहे. एजंटांनी चालविलेले कार्यालय म्हणून प्रतिमा आहे. त्यात महाभाग कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीने आणखीनच चुकीचा संदेश जात आहे.