अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
By admin | Published: April 16, 2016 01:58 AM2016-04-16T01:58:20+5:302016-04-16T01:58:20+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन
सामाजिक न्याय विभाग : बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रक्तदान
यवतमाळ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
शासनाने बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याच्या निर्णय घेतला. त्यानिमित्त १४ एप्रिलपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात असून त्यातंर्गत सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती लता खांदवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, समाजकल्याण अधिकारी जया राऊत, विशेष अधिकारी पियुष चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी स्वत: रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. त्यात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कणेर्वार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. दरबस्तेवार, पोलिस उपनिरीक्षक अनुप वाकडे यांच्यासह समाजकल्याणच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
यावेळी रक्तसंकलनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चमू उपस्थित होती. रक्तदान करणाऱ्यांना रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने सभापती लता खांदवे, डॉ. कलशेट्टी व उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)