कळंब येथील प्रशासकीय इमारतीचे अधिकाऱ्यांना वावडे
By admin | Published: May 26, 2017 01:16 AM2017-05-26T01:16:07+5:302017-05-26T01:16:07+5:30
तालुक्यातील नागरिकांना सोयीचे व्हावे, म्हणून सर्व प्रशासकीय विभागाचा कारभार एकाच इमारतीतून
केवळ तहसील कार्यालय सुरू : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्यातील नागरिकांना सोयीचे व्हावे, म्हणून सर्व प्रशासकीय विभागाचा कारभार एकाच इमारतीतून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कळंब येथे प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीचे लोकार्पणही केले. परंतु तहसील कार्यालय वगळता इतर कार्यालय प्रमुखांनी या इमारतीत येण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे नागरिकांना इतर कार्यालयाच्या चकरा मारताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली ही प्रशासकीय इमारत धूळखात पडली आहे.
सध्याच्या स्थितीत कळंब शहराच्या वेगवेगळया भागात शासनाच्या विविध विभागाची कार्यालये सुरु आहेत़ काही कार्यालये स्वतंत्र्यपणे शासकीय जागेवर तर काही कार्यालये भाड्याच्या इमारतीतून प्रशासकीय कारभार सांभाळीत आहे़ त्यामुळे नागरिकांना आपली कामे करताना चांगलेच हेलपाटे घ्यावे लागते़ या कार्यालयातून त्या कार्यालयात जाताना वेळ खर्ची होतो़ सोबतच अशी अनेक कामे असतात की जी अनेक विभागांंशी संबधित असतात़ अशावेळी एकाच इमारतीतून सर्व प्रशासकीय कार्यालयाचा कारभार चालल्यास नागरिकांसाठी आपली कामे करताना वेळ व पैश्याची बचत होईल़ या हेतुने या इमारतीची उभारणी करण्यात आली. परंतु इमारतीचे लोकार्पण होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला असतानाही तहसीलदार रणजित भोसले सोडले तर इतर अधिकाऱ्यांना या इमारतीचे वावडे असल्याचे दिसून येते.
या प्रशासकीय इमारतीत दुय्यम उपनिबंधक कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नोंदणी कार्यालय आदींसाठी अद्यावत बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत सोबतच इमारतीमध्ये व्हीआयपी रुम, व्हीडीओ कॉन्स्फरन्स हॉलसह स्वतंत्र्य कॉन्स्फरन्सची व्यवस्था, आॅडीटोरीयम सभागृहाचीही निर्मिती करण्यात आली आहे, असे असताना इतर कार्यालय प्रमुखांनी या इमारतीत येण्यास का टाळाटाळ चालविली याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे. विशेष म्हणजे तहसीलदार रणजित भोसले यांनी यासंबधी सर्व कार्यालयाशी पत्रव्यवहारही केल्याचे त्यांनी सांगितले. तरीही सध्या कुणी यायला तयार नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरच आता या घडामोडींची दखल घेण्याची गरज आहे.