अरे व्वा ! टायपिंग, शाॅर्टहॅन्डचा कोर्स आता मोफत! राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ
By अविनाश साबापुरे | Published: June 23, 2024 07:48 PM2024-06-23T19:48:38+5:302024-06-23T19:48:51+5:30
सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे...
यवतमाळ : विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रमासह शाॅर्टहॅन्डचाही संपूर्ण कोर्स आता मोफत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याबाबत अमृत संस्थेची करार करण्यात आला असून लवकरच सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांशीही करार केला जाणार आहे.
सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, युवक, युवतींना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मात्र लवकरच सारथी, महाज्योती, बार्टी, तसेच आदिवासी संशोधन संस्थेशीही करार करुन विविध मागास घटकातील विद्यार्थ्यांनाही हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे."
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात कोर्सचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. याबाबत परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करारनामा करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या जूनच्या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे. टायपिंग व शाॅर्टहॅन्ड परीक्षेत दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
उमेदवार संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्सचा खर्च त्याला दिला जाणार आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापक विनय जोशी यांच्याशी करार झाला आहे. सध्या खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना याचा लाभ होईल. मात्र सारथी, महाज्योती, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेशीही करार करण्याचा प्रयत्न आहे. मी स्वत: त्यांच्या संचालकांशी यादृष्टीने चर्चा केली आहे. दुसऱ्या टप्प्यात या संस्थांशी करार झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
कुणाला किती अर्थसहाय्य मिळणार?
- टायपिंगसाठी ६,५०० : जीसीसी-टीबीसी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ४८००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी सहा हजार ५०० रुपये मिळतील.
- शाॅर्टहॅन्डसाठी ५,३०० : लघुलेखन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ३६००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी पाच हजार ३०० रुपये मिळतील.
निकष काय?
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- लघुलेखन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण असावा.
- पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे अर्थसहाय्य जमा होईल.
- त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.