जुनाडा पुलामुळे वणी-भद्रावतीचे अंतर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 08:33 PM2020-03-02T20:33:54+5:302020-03-02T20:34:09+5:30
या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा नदी वाहते. अनेकदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह फुगून या गावाचा संपर्कदेखील तुटतो. पूर्वी जुनाडा सभोवताल कोळशाची खाण होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी-उकणी मार्गावर जुनाडालगत वर्धा नदीवर २१ कोटी ५१ लाख रूपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे वणी ते भद्रावतीचे अंतर १५ किलोमीटरने कमी होणार आहे.
या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा नदी वाहते. अनेकदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह फुगून या गावाचा संपर्कदेखील तुटतो. पूर्वी जुनाडा सभोवताल कोळशाची खाण होती. पुल बांधण्यासाठी सर्वप्रथम नदीचे पाणी अडविण्यात आले. त्यानंतर पाईप टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ मे २०१९ ला या पुलाच्या बांधकामाची निविदा काढली. या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर भद्रावती तालुक्यातील सुमठाणा, तेलवासा या गावांना हा रस्ता जोडला जाणार आहे. जुनाडापासून तेलवासा (ढोरवासा), सुमठाणावरून जाणाºया राज्य मार्गाचे अंतर केवळ नऊ किलोमीटरचे आहे.
या पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट टीएनटी कंपनीला देण्यात आले आहे. पुलाची लांबी २.३० मीटर असून पुलाला चार मजबूत सिमेंट खांब राहणार आहे. चार खांबांचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. जुनाडा ते उकणीपर्यंत मोठा रस्ता नसल्याने या रस्त्याचे कामही काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. भालर ते जुनाडापर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. मात्र या रस्त्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती वणीचे सा.बां.उपअभियंता तुषार परळीकर यांनी दिली.