आयुष्याची कमाई लबाडांनी खाल्ली.. अखेर वृद्धाची प्राणज्योत मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 12:55 PM2021-12-12T12:55:01+5:302021-12-12T13:17:30+5:30
म्हातारपणात आवश्यक बाबींसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला, अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाले नाही.
गजानन अक्कलवार
यवतमाळ : कष्टाने कमविलेले स्वत:च्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मागील दोन महिन्यांपासून अनेक ठिकाणी चकरा मारल्या. अनेकांना विनंती-विनविण्या केल्या. पैसे मिळतील, यापलीकडे कोणीही उत्तर दिले नाही. दरम्यान, पैसे कधी मिळतील? या चिंतेत त्यांची प्रकृती खालावत गेली. दोन दिवसांपूर्वी त्यांना याच विवंचनेत हृदविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तालुक्यातील कोठा (वेणी) येथील सुरेश तुळशीराम हजारे हे ७३ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी. काटकसर करून चार पैसे गाठीशी बांधायचे. त्यांनी स्वत: व पत्नीच्या नावाने कोठा येथील पोस्टात संयुक्त खाते उघडले. म्हातारपणात आजारपण व इतर आवश्यक बाबीसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरेल, असे त्यांना स्पष्ट दिसत होते.
या उपरांतही पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला. त्यांनी अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाले नाही. एवढेच नाही तर येथील पोस्ट कर्मचारी गौरव दरणे यालाही पोलीस जेरबंद करू शकले नाही. गौरव दरणे याने त्यांच्या हक्काच्या मेहनतीवर राजरोसपणे गंडा घातला. याच विवंचनेत त्यांची प्रकृती खालावत गेली. काही काळ त्यांनी जेवणही सोडले होते. अनेकजण त्यांना आशेचा किरण दाखवित होते. परंतु त्यांचे मन मात्र मानायला तयार नव्हते.
प्रत्येक वेळी ते पैसे मिळेतील की नाही, याची माहिती विचारत होते. त्यांना कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक प्रतिसाद मिळायला. माझ्या मरणापूर्वी मला पैसे मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. या घटनेमुळे कोठावासीयांनी मात्र हळहळ व्यक्त केली.
पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह
गैरप्रकार करणारा पोस्ट कर्मचारी गौरव दरणे याच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. परंतु पोलिसांना तो अजूनही सापडलेला नाही. कळंब पोलीस त्याचा कितपत प्रामाणिक शोध घेत आहे, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.