वृद्धाचा खून किरकोळ भांडणातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 10:31 PM2017-08-01T22:31:23+5:302017-08-01T22:31:47+5:30
मोहा परिसरात नागपंचमीच्या रात्री किरकोण भांडणातून वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोहा परिसरात नागपंचमीच्या रात्री किरकोण भांडणातून वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी शहर ठाण्याच्या शोध पथकाने गोपनीय माहितीवरून आरोपीचा माग कढून मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.
गजानन रामकृष्ण कुमरे (२५) रा. मोहा, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. २६ जुलै रोजी गजानन आणि मृत मुरलीधर तायडे (६०) यांच्यात ‘अष्टाचंगा’ खेळताना लाथ लागल्यावरून वाद झाला. त्यावेळी तायडे यांनी गजाननला शिविगाळ केली. याचाच राग मनात धरून गजानने गुरूवारी २८ जुलै रोजी रात्री जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात झोपून असलेल्या मुरलीधरच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सुरूवातीला झोपण्याच्या वादातून एखाद्या विमनस्क व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र नंतर शोध पथकाने सखोल तपास केल्यानंतर वेगळेच वास्तव पुढे आले. आरोपी गजाननने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत बाविस्कर, सहायक निरीक्षक संतोष इंगळे, जमादार रवी आडे, सचिन राठोड, शोध पथकाचे उपनिरीक्षक मंगेश भोयर, जमादार गजानन क्षीरसागर, नीलेश भुसे, सुधीर पिदूरकर, सागर सिडाम, नीलेश घोसे, बदर शेख, अल्ताफ शेख यांनी केली.