शेतातून घरी जात होता, दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला
By विलास गावंडे | Published: February 2, 2024 02:15 PM2024-02-02T14:15:29+5:302024-02-02T14:16:14+5:30
या घटनेची यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
जोडमोहा (यवतमाळ) : शेतमजूरी करून घराकडे पायदळ निघालेल्या युवकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पांढरकवडा महामार्गावर जोडमोहाजवळील हायवे पोलिस चौकीजवळ घडली. विशाल बापूराव टेकाम (२७, रा.जोडमोहा, ता.कळंब), असे मृताचे नाव आहे.
मोहदा गावाकडून जोडमोहाकडे येत असलेल्या भरधाव दुचाकीची विशाल टेकाम याला धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाली. लगेच यवतमाळ येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नागपूर येथे हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. घटनेनंतर दुचाकीस्वार पसार झाले. त्यांनाही गंभीर दुखापत झाली. ते कळंब तालुक्यातील तासलोट या गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जाते. या घटनेची यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.