लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दाम्पत्याने विष घेतले; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज
By विलास गावंडे | Published: October 25, 2022 03:02 PM2022-10-25T15:02:19+5:302022-10-25T15:06:13+5:30
कळंब तालुक्यातील घटना
डोंगरखर्डा (यवतमाळ) : सर्वत्र दीपोत्सवाची तयारी सुरू असताना राघो पोडात गंभीर घटना घडली. भरदिवसा दाम्पत्याने विषारी औषध घेतले. पतीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना कळंब तालुक्यातील अंतरगाव ग्रामपंचायत अंतर्गत राघो पोड येथे सोमवारी घडली.
प्रदीप चंद्रभान जुनगरे (२७), असे मृताचे नाव आहे. वनिता प्रदीप जुनगरे (२०) यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांमध्ये दुपारी वाद झाला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. या दोघांनीही घरात ठेवून असलेले कीटकनाशक घेतले. वनिता ओरडत घराबाहेर आली. तेव्हा परिसरातील नागरिक मदतीकरिता धावून गेले.
अंतरगावचे उपसरपंच गौरव मडावी, सुरेश कुमरे यांनी या दोघांनाही तातडीने मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथून यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, प्रदीपचा मृत्यू झाला. या कुटुंबात प्रदीप, वनिता या दाम्पत्यासह प्रदीपचे आई, वडील, बहीण आहेत. घटनेच्यावेळी बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती, तर आई मजुरीकरिता शेतात गेली होती. वडील ऊस तोडणीच्या कामासाठी कोल्हापूरकडे गेले होते. या घटनेमुळे राघो पोडात उत्सव साजरा झाला नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.