‘ओटीएस’साठी पुन्हा एकदा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:40 PM2019-05-12T21:40:38+5:302019-05-12T21:41:12+5:30
कर्जमाफी योजनेत दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा (ओटीएस) लाभ मिळणार आहे. अशा कर्ज प्रकरणाची मुदत संपली होती. या प्रकरणात सहकार विभागाने ३० जूनपर्यंतचा अवधी वाढवून दिला आहे. यामुळे दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत उर्वरित रकमेची तजवीज करण्याची संधी मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफी योजनेत दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा (ओटीएस) लाभ मिळणार आहे. अशा कर्ज प्रकरणाची मुदत संपली होती. या प्रकरणात सहकार विभागाने ३० जूनपर्यंतचा अवधी वाढवून दिला आहे. यामुळे दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत उर्वरित रकमेची तजवीज करण्याची संधी मिळणार आहे.
मुळात अशा कर्जदार शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. यामुळे ही ओटीएस भरण्यासाठी रक्कम आणायची तरी कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या योजनेला मुदतवाढ मिळाली असली तरी पैशाची सोय नाही. यामुळे मुदतवाढीने दिलासा मिळूनही शेतकऱ्यांची विवंचना कायम आहे.
८,३११ शेतकरी अडचणीत
वनटाईम सेटलमेंट योजनेत जिल्ह्यातील आठ हजार ३११ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांनी दीड लाखावरील कर्ज रक्कम भरली, तर त्यांना ९१ कोटी ३९ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र पैसा नसल्याने हे शेतकरी पेचात पडले आहेत. याबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.