एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

By अविनाश साबापुरे | Published: August 18, 2023 06:04 PM2023-08-18T18:04:08+5:302023-08-18T18:05:34+5:30

पुसद येथे वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण

One and a half crore farmers will benefit from insurance for one rupee - Agriculture Minister Dhananjay Munde | एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

googlenewsNext

पुसद (यवतमाळ) : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

पुसद येथे शुक्रवारी ‘वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हा समारंभ झाला. यावेळी आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, माजी राज्यमंत्री डॅा. एन. पी. हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने व शेतकरी उपस्थित होते.

हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. मुख्यमंत्री असताना दुष्काळासारख्या संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी राज्यात हरितक्रांती घडविली. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना आजही सुरु आहे. राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.

पीएम किसान योजनेंतर्गत ४५ लाख लोकांना लाभ मिळाला. ई-केवायसी, आधार लिंक, भूमिअभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याचा लाभ दिला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना पुन्हा सुरु करणार आहोत. मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचनासाठी अर्ज करणाऱ्यांना लाभ दिला जाईल. खते, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे हे काम कौतुकास्पद असल्याचे मुंडे म्हणाले.

पुरस्कारार्थींची माहिती

यावेळी प्रगतीशिल शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात कपिल जयप्रकाश जाचक (जाचकवाडी, जि. पुणे), बजरंग सदाशिव साळुंखे (बामणी, जि. सोलापूर), विश्वास आनंदराव पाटील (लोहारा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (कुसुंबा, जि. धुळे), बाळासाहेब नारायणराव पडूळ (लाडसावंगी, जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (कुंभेफळ, जि.औरंगाबाद), मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (लांजा, जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (खानू, जि. रत्नागिरी), रवींद्र जयाजी गायकवाड (गायवड, जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (लवारी, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (चिंचविहिरे, जि. अहमदनगर) यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Web Title: One and a half crore farmers will benefit from insurance for one rupee - Agriculture Minister Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.