वडकी येथे वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीड लाखांची घरफोडी
By admin | Published: November 21, 2015 02:54 AM2015-11-21T02:54:28+5:302015-11-21T02:54:28+5:30
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री घरफोडी झाली.
एका चोरीचा प्रयत्न असफल : सायरनमुळे चोरटे सावध
वडकी : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये गुरुवारी रात्री घरफोडी झाली. इंद्रकांत घुगरे यांच्या घरातून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेल्याने विद्युत कर्मचारी इंद्रकांत घुगरे हे घराला कुलूप लाऊन ड्यूटीवर गेले होते. हिच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून प्रवेश केला. घरातील साहित्याची फेकफाक केली. दिवाणमधून कपाटाची चावी शोधली. त्यातील पोत, अंगठी असा दीड ते दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
घुगरे यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी याच परिसरातील किराणा व्यावसायिक अशोक गुळघाणे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. गुळघाणे यांनी आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान, लगतच्या ले-आऊटमधील विलास मॅनमवार यांनी परिसरात चोरटे आल्याची माहिती पोलीस ठाण्याला कळविली. मात्र पोलीस सायरन वाजवित आल्याने चोरटे सावध झाले. यानंतर त्यांनी घुगरे यांच्या घरातील साहित्य लांबविले.
घटनेची तक्रार नोंदविण्यास गेलेल्या घुगरे यांना पोलीसी खाक्याचा त्रास सहन करावा लागता. तक्रार नोंदविण्याऐवजी त्यांच्यावरच प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणेदार अमोल माळवे प्रशिक्षणासाठी गेले असल्याने या ठाण्याचा प्रभार महिला अधिकाऱ्यांकडे होता. अधिकारीच नसल्याने ठाण्यात उपस्थित पोलीसही गाढ झोपेत होते. गस्तीवरील वाहनाची फेरी महामार्गावर सुरू होती. (वार्ताहर)