पळशी फाट्यावर दीड तास चक्काजाम

By admin | Published: November 22, 2015 02:34 AM2015-11-22T02:34:50+5:302015-11-22T02:36:22+5:30

शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रश्न घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता पळशी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

One-and-a-half hour drive | पळशी फाट्यावर दीड तास चक्काजाम

पळशी फाट्यावर दीड तास चक्काजाम

Next

शेतकऱ्यांचे प्रश्न : पोफाळी-मुळावा जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध समस्यांचा कळस
उमरखेड : शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रश्न घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता पळशी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोनही बाजूंकडून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महसूल, विद्युत आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
पोफाळी-मुळावा जिल्हा परिषद सर्कलमधील हातला, मुळावा, दिवट पिंपरी, कळमुला, तरोडा, पळशी, अंबाळी, कुपटी, धनज, मोहदरी, नागापूर, गंगनमाळ, जनुना आदी भागातील विद्युत रोहित्र जळले आहेत. या संदर्भात विद्युत कंपनीच्या संबंधित विभागाकडे निवेदने, चर्चा आदी माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. यानंतरही हा प्रश्न निकाली काढला गेला नाही. परिणामी विजेच्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. लाईनमनही देखभाल, दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. नवीन डीपी लावून विजेचा प्रश्न निकाली काढावा, खरीप पिकाचा विमा मंजूर करावा यासह परिसरातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
शेंबाळपिंपरी रस्ता, मुळावा ते सावरगाव रस्ता, पळशी फाटा ते शिळोणा रस्ता गेली अनेक वर्षंपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याहून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र कुणीही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सदर भागातील नागरिक शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले. सकाळी १० वाजतापासून पळशी फाट्यावर नागरिकांनी ठिय्या दिला. उमरखेडचे तहसीलदार राजेश चव्हाण, विद्युत कंपनीचे अभियंता पी.के. राठोड, ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पुसद-उमरखेड रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागली होती.
माजी आमदार विजयराव खडसे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, पंडितराव कांगारकर, महिला व बाल कल्याण सभापती विमलताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई ठेंगे, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. विठ्ठलराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव धुमाळे, पंचायत समिती सदस्य मनीषा कराळे, चितांगराव कदम, सतीश लकडे, पोफाळीचे सरपंच नरेंद्र बरडे, सदाशिव ढोरे, प्रज्ञानंद खडसे, बाळासाहेब डाखोरे, मारोतराव कदम, कुमार कानडे, अवधुतराव चव्हाण, माजी बांधकाम सभापती रमेश चव्हाण, माजी सभापती सविताताई कदम, कविता पोपुलवार, रंजना घोंगडे, सुरेखा ठाकरे आदींचा या आंदोलनात सहभाग होता. (शहर प्रतिनिधी)

विधानसभेनंतर प्रथमच कार्यकर्ते रस्त्यावर
विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर तालुक्यात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठल्याही प्रश्नावर एकत्र आले नव्हते. शनिवारी पळशी फाटा येथे झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी आपले अस्तित्व दाखविले. जवळपास २५ ते ३० गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लोकांच्या प्रश्नांना घेऊन आवाज उठविला. तालुक्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. यात शेतकऱ्यांसह मजूर, बेरोजगार आणि नागरिकांच्या समस्यांचा समावेश आहे. गेली वर्षभरात या प्रश्नासंदर्भात काँग्रेसमधील कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी निवेदने, मोर्चा, धरणे आदी प्रकारची आंदोलने अपवादेनेही केली नव्हती. संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडण्याचे सौजन्यही त्यांच्याकडून कधी दाखविले गेले नाही. शनिवारी पळशी फाटा येथे पोफाळी परिसरातील प्रश्नांच्या निमित्ताने ते एकत्र दिसून आले. हा विषय तालुक्यात चर्चेचा झाला आहे.

Web Title: One-and-a-half hour drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.