दीड लाख शेतकरी लाभापासून वंचित
By admin | Published: July 8, 2014 11:40 PM2014-07-08T23:40:13+5:302014-07-08T23:40:13+5:30
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक
पीक विमा : ९७ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटी
यवतमाळ : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभास मुकले आहेत. केवळ ९७ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटींची मदत दिली जाणार आहे.
खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये दोन लाख ९७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. दोन लाख ५४ हजार ३३० हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. यासाठी शेतकरी आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे १९ कोटी ८९ लाख ९७ हजारांचा हप्ता भरला होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा होती. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांची निराशा केली. केवळ ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले. यात सर्वाधिक मदत उमरखेड तालुक्याला नऊ कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहे. तर वणी तालुक्याच्या वाट्याला सर्वात कमी मदत आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि तूर या पिकांचा विमा काढला होता. कंपनीने ६० टक्के जोखीमस्तर स्वीकारला होता. यामध्ये कापसाला केवळ तीन तालुक्यातील चार मंडळाला मदत मिळाली. तर १४ तालुक्यातील एक लाख शेतकरी अपात्र ठरले. जिल्ह्यातील १०१ मंडळात तुरीला एक छदामही मिळाला नाही. ७३ हजार ४३८ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लाख ९३ हजार १३८ रुपयांची मदत जाहीर झाली आहे. (शहर वार्ताहर)