जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:06+5:30

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. 

One and a half lakh students in the district will get free uniforms | जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

Next
ठळक मुद्देसमग्र शिक्षा : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी समग्र शिक्षातून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मात्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला साडेचार कोटी रुपयांचा निधीही मिळाला असून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दीड लाख विद्यार्थ्यांसाठी गणवेश घेण्याची धावपळ सुरू होणार आहे.
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. 
यंदा मात्र कोरोनामुळे जून महिन्यात शाळा सुरू होऊ शकल्या नाही. शिवाय मार्चपासूनच लॉकडाऊन झाल्याने मंजूर झालेला निधीही प्राप्त होऊ शकला नाही. नंतरच्या काळात शासनाने दोन गणवेशाऐवजी एकच गणवेश देण्याचा निर्णय घेऊन प्रती विद्यार्थी ६०० ऐवजी ३०० रुपयांचा निधी आता मंजूर केला आहे. तर दुसरीकडे शाळेचेही अर्धे सत्र संपून गेले आहे. त्यामुळे किमान एक गणवेश तरी विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.
यात एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी पात्र आहेत. तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद, आणि शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. यात विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी पात्र ठरत नाही. 
त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेने तसेच नगरपरिषदेने स्वत:चा निधी वापरावा, अशी मागणी दरवर्षी केली जात आहे. मात्र याबाबत अद्यापही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली दिसून येत नाही. 

गणेवश विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचविणार 
सध्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी काही शिक्षक मात्र शाळेत जात आहेत. तर गणवेशाचा निधीही शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिवून घेतलेला गणवेश शिक्षक विद्यार्थ्यांना घरपोच नेऊन देणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेला   मिळाले साडेचार कोटी 
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यवतमाळ जिल्ह्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेशासाठी चार कोटी ६४ लाख ३५ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा निधी जिल्हास्तरावर पोहोचलेला असून तो तालुका व गटस्तरावरून शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. आता यातून कोणता कापड खरेदी करावा, कोणत्या रंगाचा गणवेश असावा याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती घेणार असून समितीच गणवेश शिवून घेइल किंवा तयार गणवेश विकत घेऊन वाटप करणार आहे. मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यातच विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेऊन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता ऐनवेळी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची मापे घेण्याची वेळ शाळांवर आली आहे. 

शाळांमध्ये दररोज ५० टक्के शिक्षक उपस्थित राहत आहेत. ते विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश देतील. शिवाय नुकत्याच झालेल्या व्हीसीनुसार प्राथमिक शाळाही येत्या महिनाभरात सुरू होण्याचे संकेत आहेत. आमची व शिक्षकांची त्यादृष्टीने तयारी आहे. फक्त शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.
- प्रमोद सूर्यवंशी,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ

Web Title: One and a half lakh students in the district will get free uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.