एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:54 AM2020-07-28T11:54:36+5:302020-07-28T11:57:52+5:30
एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘कोविड-१९’ च्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांवर अनेक आघात केले जात आहे. वेतनाला कात्री त्यातही अनियमितता, सक्तीची रजा, सेवा खंडित, स्वेच्छा निवृत्ती, असे अनेक वार कर्मचाऱ्यांवर बसत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी व्रजमूठ गरजेची असल्याची जाणीव झाल्याने तसे प्रयत्न केले जात आहे.
एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. बसफेऱ्या चालविणे, कर्मचाऱ्यांचा पगार करणे, कार्यालयीन खर्च यासाठी लागणारा पैसा उभा होणे कठीण झाले आहे. मार्च पेड इन एप्रिलच्या पगारापासूनच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला घरघर लागली आहे. जून पेड इन जुलैचा पगार अजूनही झालेला नाही.
पैसा वाचविण्यासाठी एसटीकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. रोजंदार गट-१ मधील जवळपास चार हजार ५०० कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. नव्यानेच सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांना कोटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येत आहे. काम नाही तर दाम नाही, या एसटीच्या धोरणाचे ते बळी ठरले आहे.
कर्मचारी कामगिरी करण्यास तयार असताना त्यांना सक्तीची रजा दिली जात आहे. यातही आर्थिक नुकसान होण्याची भीती कामगारांना आहे. परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून ही रजा लादली जात असल्याचा आरोप होत आहे. २७ हजार कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वेच्छा निवृत्ती ऐच्छिक असावी, सक्ती नसावी. तसे झाल्यास कामगार करारातील तदतुदीचा भंग ठरेल, असे सांगितले जाते.
कामगारांचे अहित असल्याने महामंडळाने आपली भूमिका बदलवावी, यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी आपापल्या पातळीवर हातपाय हालवले. मात्र महामंडळावर त्याचा कुठलाही असर झाला नाही. म्हणून आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही, याची उपरती झाली. कामगार संघटनेने एक पाऊल पुढे टाकत सर्व संघटनाच्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. संघटनेचे जनरल सेके्रटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळातील सर्व कामगार संघटनांना एक होण्याचे आवाहन केले आहे.
आता लढाई निकराची
सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या पवित्र उद्देशाने संघटनेने उचललेले हे पाऊल आहे. आता लढाई निकराची आहे. सर्वांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. यादृष्टीने संघटनांशी संपर्क केला जात आहे. सर्व संमतीने येत्या काही दिवसात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाईल, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.