१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

By admin | Published: March 22, 2017 12:11 AM2017-03-22T00:11:37+5:302017-03-22T00:11:37+5:30

शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे.

One crore counts for water in 13 years | १३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

Next

वणी नगरपालिका : नवरगाव धरणात ३२.३६ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे सावट
आसिफ शेख  वणी
शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे. तालुक्यात कोळसा खाणीची संख्या वाढल्याने पाण्याचे अनेक नैैसर्गिक झरे तुटले आहेत. २००४ पासून या नदीला जीवदान देण्याकरिता नवरगाव धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. या धरणातून पाणी घेण्यासाठी वणी नगरपालिकेने पाण्यासाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल एक कोटी रुपये खर्च केलेत. आता या धरणात केवळ ३२.३६ टक्के जलासाठा शिल्लक असून चार महिने नगरपरिषदेने योग्य नियोजन केले, तरच पाणी टंचाईवर मात करता येणार आहे.
वणी शहराची लोकसंख्या ६२ हजार असून हे शहर ‘ब’ गटात मोडते. शहराची पाणी पुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून निर्गुडा नदीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. २००५ पूर्वीसुद्धा भर उन्हाळ्यात या नदीने दगा दिला नव्हता. मात्र कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सुरू झाल्याने या नदीचा कृत्रिम पाणी पुरवठा बंद झाला. डिसेंंबर ते जानेवारी महिन्यापासून या नदीचा पाणी प्रवाह बंद पडतो. त्यामुळे शहराला पाणी टंचाई जाणवते. शहरात सहा लाख ७५ हजार लिटर व ११ लाख २५ हजार ३०० लीटर मर्यादा असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच २५ ट्युबवेल असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु निगुर्डा नदीचा प्रवाह मध्येच बंद पडल्याने धरणातून पाणी आरक्षित करून वणीकरांची तहान भागविली जात आहे.
वणी नगरपरिषदेने २.०० दलघमी, मारेगाव ०.६० दलघमी व जीवन प्राधिकरण ग्रामीण विभागाने ०.५० दलघमी पाणी पुरवठा आरक्षित केला आहे. वणी नगरपरिषदेने मागील वर्षी ४.७० दलघमी जलसाठा आरक्षित केला होता. त्यासाठी १० लाख ८० हजार रूपये पाण्याचे जमा केले होते. नगरपरिषदेकडे थकबाकी नसल्यामुळे पाण्याची मागणी वाढल्यास यावर्षीसुद्धा पुन्हा जास्त पाणी आरक्षित करू शकतात. नगरपरिषदेने २००४ पासून नवरगाव धरणाला एक कोटी रूपये दिले आहे. मागीलवर्षी ५८ तासांत पाणी नवरगाव धरणातून वणीपर्यंत पोहोचत होते. परंतु यावर्षी वातावरणात ओलावा असल्याने ३० तासात पाणी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे समजते.
एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान जादा भडकल्यास प्रकल्पातील पाण्याचे ७५ टक्के एम.एम.म्हणजे तीन दशलक्ष घनमीटर एवढे बाष्पीभवन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे.

नवरगाव धरण बनले वणी शहराची गरज
नवरगाव धरण हे मारेगावची तहान भागविण्याकरिता प्रकल्प उभारला आहे. परंतु तो वणी शहराची गरज बनला आहे. नगरपरिषदेने कायमस्वरूपी पाणी योजनेसंदर्भात काय धोरण आहे, हे अद्यापही स्पष्ट केले नाही. नवरगाव धरणाचे पाणी आरक्षीत करून आपले काम तात्पूरते चालविण्यात येत आहे. नवरगाव धरणातून पाणी सोडले, तर वणीपर्यंत पाणी येताना मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते. त्यासाठी २५ किलोमीटरची पाईपलाईन योजना टाकणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वणीकरांची अपेक्षा आहे.

 

Web Title: One crore counts for water in 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.