लोकसहभागातून एक कोटी
By admin | Published: August 15, 2016 01:19 AM2016-08-15T01:19:25+5:302016-08-15T01:19:25+5:30
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक
बळीराजा चेतना अभियान : नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत
रूपेश उत्तरवार यवतमाळ
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक कोटी रूपयांची मदत बळीराजा चेतना अभियानात गोळा झाली आहे. जिल्हा प्रशासनाने हा निधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वळता केला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या बाबीसाठीही शेतकरी कुटुंबाला मदत मिळणार आहे. यासोबतच कॅन्सरसारख्या दुर्धर आजार आणि शिक्षणासाठी ही मदत दिली जात आहे.
आर्थिक विवंचनेने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात शासनच नव्हेतर लोकसहभागातूनही निधी मिळत आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाने तितक्याच पारदर्शकतेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे. कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांना या अभियानातून १० हजार रूपयांचा निधी दिला जात आहे. आतापर्यंत ३६ शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली. यासोबतच संकटावर मात करण्यासाठी ४२ नवीन प्रस्ताव पुढे आले आहेत. एमबीबीएस अथवा अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता आर्थिक अडसर निर्माण होताच प्रत्येक विद्यार्थ्याला ३० हजारा याप्रमाणे आठ कुटुंबांना ही मदत वितरित करण्यात आली. वीजतारांच्या स्पर्शाने अथवा विहिरीत पडून जनावराचा नैसर्गिक मृत्यू झाला, फुटवे खावून जनावरे मेली, तर अशा प्रकरणात शासनाकडून कुठलीही मदत शेतकरी कुटुंबाला मिळत नाही. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून प्रत्येकी १० हजाराप्रमाणे मदत देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लोकसहभागातून मिळालेल्या रकमेपैकी आतापर्यंत ६५ लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत प्री-परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना पाच हजार रूपयांची मदत दिली जात आहे. यातून विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करता येणार आहे. या योजनेसाठी शेकतऱ्यांची अनेक मुले पुढे आली आहेत. या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हा मुख्य उद्देश आहे.