हद्दवाढीसाठी एक कोटीची तरतूद
By admin | Published: February 27, 2015 01:40 AM2015-02-27T01:40:12+5:302015-02-27T01:40:12+5:30
नगरपरिषदेने मंजूर केलेल्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शहराच्या हद्दवाढीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे.
यवतमाळ : नगरपरिषदेने मंजूर केलेल्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शहराच्या हद्दवाढीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. यावरून येत्या काही दिवसात शहराच्या हद्दवाढीचे संकेत मिळत आहेत. याशिवाय अर्थसंकल्पात शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी एक कोटी ४० लाख, नाट्यगृहासाठी दोन कोटींची तरतूद केलेली आहे. शासकीय अनुदानासह २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकात १०३ कोटी २२ लक्ष रुपये दर्शविले आहे. तर खर्चावर ६९ कोटी ७० लक्षाची तरतूद करण्यात आली आहे. त्यात निधीसह ३३ कोटी ५१ लाख रुपये शिल्लकी असल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषदेत दिली.
या अर्थसंकल्पात शिलकीमध्ये २८ कोटी ३४ लाखाचा शासकीय निधी तर नगरपरिषदेची महसुली शिल्लक दोन कोटी १० लाख रुपये आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या गृहकर वसुलीतून सहा लक्ष रुपये, वृक्षकरातून नऊ लक्ष रुपये, जाहिरात, शोटॅक्स या करातून पाच लक्ष रुपये असे सहा कोटी १४ लक्ष रुपयांचे उत्पन्न आहे. याशिवाय नगरपरिषद दुकान भाड्यातून ६८ लाख, आठवडी बाजार व दैनिक बाजार वसुलीतून ५३ लाख, इमारत परवानातून दोन लाख, गुंठेवारी विकास शुल्क पाच लाख, प्रीमीयम शुल्क ५० लाख याशिवाय निरनिराळ््या शुल्कातून दोन लाख रुपये उत्पन्न असे एक कोटी ८० लाख रुपये नगरपरिषदेला मिळत आहे.
याशिवाय शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून २२ कोटी ३४ लाख इतर संकीर्ण उत्पन्नातून दोन कोटी नऊ लाख भांडवली कामाकरिता मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून २१ कोटी नऊ लाख, ऋण व निलंबण लेखा यापासून १० कोटी ३२ लाख शिल्लकेसह जमा आहेत.
सामान्य प्रशासन व वसुली खर्चावर नऊ कोटी ५० लाख, सार्वजनिक सुरक्षिततेवर सहा कोटी २९ लाख, आरोग्य व सुविधेवर १६ कोटी १५ लाख यासह असा एकूण ३५ कोटी ८७ लाख महसुली खर्च अपेक्षित आहे. २६ प्रकारच्या भांडवली व विकास कामावरील खर्चासाठी ३२ कोटी ३० लाखाची तरतूद केली आहे. असाधारण खर्चासाठी एक कोटी ५३ लक्ष रुपयांची तरतूद आहे. असा एकंदर ६९ कोटी ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये नाविण्यपूर्ण कामांचाही समावेश केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण ३० लाख रुपये, पुतळा परिसर रंगकामे, तैलचित्र रंगकाम, स्थलांतर यावर १० लाख रुपये, कुंपणे व मालमत्ता उभारणीवर २५ लाख रुपये, बगीचा बांधकाम देखरेखीसाठी २५ लाख, नऊ कोटी ६८ लाख आस्थापना खर्च, स्ट्रिट लाईट बिलावर एक कोटी ५५ लाख, नवीन पथदिवे व विद्युत पोल स्थानांतरणासाठी एक कोटी, पाणी बीलासाठी एक कोटी २० लाख, विहिर दुरूस्ती पाच लाख अशा ६३ छोट्यामोठ्या कामांसाठी तरतूदी करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय व मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी पत्रपरिषदेत दिली. (कार्यालय प्रतिनिधी)