प्रक्रिया अर्धवट राहिलेल्यांना एक दिवसाची मुदतवाढ
By admin | Published: November 19, 2015 03:07 AM2015-11-19T03:07:09+5:302015-11-19T03:07:09+5:30
जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी अर्जाचा पाऊस पडत असताना सर्व्हर डाऊन झाले. अनेक उमेदवारांची प्रक्रिया अर्धवट राहिली,...
नोकरभरती : जिल्हा परिषद सर्व्हर कासवगतीने, १९५ पदांसाठी अर्जांची संख्या पोहोचली ९० हजारांवर
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी अर्जाचा पाऊस पडत असताना सर्व्हर डाऊन झाले. अनेक उमेदवारांची प्रक्रिया अर्धवट राहिली, अशा उमेदवारांना आता एक दिवसाची मुदतवाढ अर्ज सादर करण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र या एका दिवसात ही प्रक्रिया पूर्ण कशी होईल, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या १५ संवर्गातील १९५ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर ही आहे. परंतु गत आठवडाभरापासून नोकरभरतीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तासन्तास सायबर कॅफेत बसून अर्ज अपलोड होत नाही. सलग तीन दिवसांपासून ही प्रणाली हँग होती. बुधवारी ड वर्गातील पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला. एकाच वेळी गर्दी उसळल्याने ही सिस्टीम संथ झाली. त्याचा अनेकांना फटका बसला. अनेक उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ध्यावर थांबली आहे. लिंक मिळत नसल्याने उमेदवार सैरभैर झाले आहे. आपला अर्ज दाखल होणार की नाही, अशी भीती त्यांना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेने अर्धवट प्रक्रिया राहिलेल्या उमेदवारांना एक दिवस मुदतवाढ दिली असून अशा उमेदवारांना २० नोव्हेंबर अर्ज दाखल करता येणार आहे. (शहर वार्ताहर)
अर्जांचा पाऊस
जिल्हा परिषदेच्या १९५ जागांसाठी तब्बल ९० हजार उमेदवारांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल केल्याची नोंद आहे. यामध्ये ड प्रवर्गातील पदांसाठी सर्वाधिक अर्ज आहे. दोन दिवसात आणखी ४० हजारांवर अर्ज येण्याची शक्यता आहे. या अर्जांची छानणी आणि परीक्षा घेण्याचे दिव्य जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे.
नोकरभरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर आहे. अशा स्थितीत प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांचे अर्ज अर्धवट राहिले आहे. त्या उमेदवारांना डाटा अपलोड करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ