काय सांगता! एका तिळाचे चक्क शंभर तुकडे, 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:08 PM2022-01-10T13:08:19+5:302022-01-10T13:37:23+5:30
एक तीळ सात जणांनी वाटून खावा' हा वाक्प्रचार एका तिळाचे शंभर तुकडे करण्यासाठी प्रेरणादायी ठरला असे अभिषेक सांगतो.
यवतमाळ : एक तीळ सात जणांनी वाटून खावा असे म्हटले जाते; परंतु पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या युवकाने एका तिळाचे सात नव्हे चक्क शंभर तुकडे करून दाखविले, ते ही १६.२० मिनिटात! त्याने केलेला हा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आला आहे.
अभिषेक सध्या नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये बीएफए करीत आहे. मायक्रो आर्ट हा त्याचा आवडीचा विषय आहे. त्याने मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचिसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तिळावर ए, बी, सी, डी ही इंग्रजी मुळाक्षरे, तसेच एक ते दहापर्यंतचे अंकही लिहिण्याचा पराक्रम केला. एक तीळ सात जणांनी वाटून खावा' हा वाक्प्रचार एका तिळाचे शंभर तुकडे करण्यासाठी प्रेरणादायी ठरला असे अभिषेक सांगतो.
पेन्सिलच्या टोकावर माहूरची रु रेणुकादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ती साकारली. वाळलेल्या पानावर कटिंग करून बुद्ध, शिवराय साकारणे, एक रुपयाच्या नाण्यावर निसर्गचित्र काढणे, आपट्याच्या पानावर निसर्ग रंग भरणे, जुन्या नाण्यांचा संग्रह करणे, तांदळाच्या दाण्यावर झेंडा रेखाटणे, पतंग रेखाटणे, अक्षरांमधून गणपती साकारणे आदी अभिषेकच्या कला भुरळ पाडणाऱ्या आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून ही सूक्ष्म कला अभिषेकने जोपासली आहे. आजोबा कृष्णा नाना नालमवार व आजी लीला यांनी प्रोत्साहन दिल्याचा तो आर्वजून उल्लेख करतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुकमध्ये आपला विक्रम नोंदवायचा आहे. या यशाबद्दल येथील बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयात प्रा. प्रदीप नागपुरे, प्रा. जफर खान यांच्या उपस्थितीत अभिषेक रुद्रवार याचा सन्मान करण्यात आला.
कलेने बनविले आत्मनिर्भर
अभिषेकच्या घरची परिस्थिती हलाखीची असून, आई-वडील व बहिणीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. अभिषेकने सूक्ष्म कलेत प्रावीण्य मिळविले आहे. कलेतून उत्पन्न मिळवीत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कलाकृती कनार्टक, आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पोहोचल्या आहेत. त्याने तयार केलेल्या सूक्ष्म गणपतीच्या विक्रीतून तीन ते चार लाखांची प्राप्ती झाली.