दोन दिवसांत मिळाले एक लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:02+5:30
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या दोन दिवसांत वणी आगाराला प्रवासी वाहतुकीतून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून तब्बल ११३ दिवस बंद असलेली बाह्यजिल्हा बससेवा गुरूवारपासून पूर्ववत सुरू झाली. त्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या मुभा देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांत आंनद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
गुरूवारी पहिल्या दिवशी वणी एस.टी.आगाराने ४० फेऱ्यांचे नियोजन केले. प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व बसेस स्वच्छ धुवून सॅनीटाईज करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता पहिली बस चंद्रपुरसाठी सोडण्यात आली. सोबतच नागपूर, यवतमाळ, वर्धासाठीही बसेस सोडण्यात आल्या. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी नागपूर, चंद्रपूर, वरोरा, यवतमाळ या मार्गावर ४३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून जवळपास ५० हजार रूपये उत्पन्न आगाराला मिळाले.
कोरोनातही लालपरीला येणार सुगीचे दिवस
शासनाने खासगी वाहनाने बाह्य जिल्हा प्रवासासाठी ई-पास बंधनकारक केली आहे. ई-पास मिळविण्यासाठी बºयाच प्रक्रियेतून जावे लागते. मात्र एस.टी.साठी ही अट शिथिल करण्यात आल्याने प्रवाशांना बसमधून ई-पासशिवाय कुठेही जाता येणार आहे. ही बाब जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची झाल्याने आता प्रवासी एस.टी.कडे वळणार आहेत. त्यातून एस.टी.उत्पन्न वाढणार असल्याने एस.टी.ला सुगीचे दिवस येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आगाराकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे एस.टी.आगार प्रमुख सुमेध टिपले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.