चाकूचा धाक दाखवून 'वसुली भाई'लाच लुटले; वडकी पोलिसांची कारवाई
By विलास गावंडे | Published: October 7, 2023 08:17 PM2023-10-07T20:17:26+5:302023-10-07T20:44:49+5:30
कंपनीने काढलेल्या जुन्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक
वडकी (यवतमाळ) : चाकूचा धाक दाखवून फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याचे एक लाख ९० हजार रुपये लुटणाऱ्या चार जणांना काही तासांत पकडण्यात वडकी पोलिसांना यश आले. सोनुर्ली ते सावरखेडा मार्गावर ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती. चोरट्यांकडून एक लाख रुपये रोख आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुथ्थूट कंपनीने काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
पांढरकवडा येथील मुथ्थूट मायक्रोफिन लिमिटेडचे वसुली अधिकारी विकास बाबाराव दवणे (२५, रा. पांढरकवडा) यांना लुटण्यात आले होते. सावरखेडा, वरध भागातून वसुली करून ते सावरखेडावरून पांढरकवड्यासाठी दुचाकीने निघाले होते. दोन युवकांनी त्यांना थांबविले. मागाहून दोघे जण आले. त्यांनी चाकू दाखवून या वसुली अधिकाऱ्याजवळील बॅग हिसकावली आणि पळून गेले. सावरखेडा गावात जाऊन त्यांनी आपबिती सांगितली. तेथील नागरिकांनी वडकी पोलिसांशी संपर्क केला.
पोलिस घटनास्थळावर पोहोचले. विकास दवणे यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेत तपास सुरू केला. वडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवून पोलिस शिपाई विलास जाधव, सचिन नेवारे, विनोद नागरगोजे आदींनी तपास सुरू करून मुथ्थूट मायक्रोफिन लिमिटेडचा कामावरून काढलेला वसुली अधिकारी ओमशिवा विश्वास शिंदे (२२, रा. उत्तरवाढोणा, ता. नेर) याला त्याच्या गावातून रात्री ताब्यात घेतले. शिवाय रोहित बबलु गोंधळे (२२), राहुल हेमंत चावरे (२१), विशाल हुकूमचंद चावरे (२२) (सर्व रा. सेवानगर, यवतमाळ) यांना पकडले. त्यांच्याकडून रोख एक लाख रुपये आणि क्रमांक नसलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. पुढील तपास वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.